
शिवसेना हा आमचा श्वास आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्री ही आमची दैवते आहेत. आम्ही सदैव शिवसेनेसोबतच राहू. मालवण तालुका शिवसेना ठामपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, अशी भूमिका शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे व बंडखोर शिवसेना आमदारांविरोधात मालवण तालुका शिवसेना कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीही यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक यांनी केली. मालवण शिवसेना शाखा कार्यालय येथे शनिवारी हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, शीला गिरकर, भाई कासवकर, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, जेष्ठ शिवसेना पदाधिकारी नंदू गवंडी, महिला समन्वयक पुनम चव्हाण, प्रवीण लुडबे, आतु फर्नांडिस, नीनाक्षी शिंदे, सन्मेष परब, गौरव वेर्लेकर, बाळू नाटेकर, उमेश मांजरेकर, यशवंत गावकर, सोमनाथ लांबोर, दीपक देसाई, पॉली गिरकर, भगवान लुडबे, जयू लुडबे, दिलीप घारे, सुहास वालावलकर, लक्ष्मी पेडणेकर, नंदा सारंग, अंजना सामंत, पुजा तळाशीलकर, प्रसाद आडवणकर, अक्षय भोसले राजन लुडबे, मनोज लुडबे, सौ. वायंगणकर, अक्षय सातार्डेकर, सुरेश मडये, दत्ता पोईपकर, प्रिया धुरी, कांचन तारी, बंड्या सरमळकर, स्वप्निल आचरेकर आदींसह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, शिवसेनेतून बंडखोरी करत आमदार कुठेही गेले तरीही शिवसैनिक व जनता शिवसेने सोबत आहे. पक्षनेतृत्वाशी प्रामाणिक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणीही गेले तरी संघटनेवर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.
या कठीण प्रसंगात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी आपली शिवसेनेशी असलेली निष्ठा दाखवून दिली आहे. खासदार विनायक राऊत हे खंबीरपणे मातोश्रीवर राहून शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. आमदार वैभव नाईक हेही शिवसेनेशी एकनिष्ठ राहून आक्रमक भूमिका मांडत आहेत. नारायण राणे यांच्यासोबत त्यावेळी गेलेले अनेक कार्यकर्ते देखील शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले आहेत, असे हरी खोबरेकर यांनी सांगून मालवण तालुक्यातील शिवसेना आजी माजी ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एकसंघ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेमुळेच सर्वसामान्य कुटुंबातील अनेक जण मोठमोठ्या पदांवर पोहोचले. माझ्यासारखा मच्छीमार कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य, तालुकाप्रमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा दक्षता समिती सदस्य यांसारख्या पदांवर पोहोचू शकला, हे केवळ आणि केवळ शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच ! शिवसेना एक कुटुंब असून बाळासाहेबांचे विचार आणि उद्धव साहेबांची दूरदृष्टी यावर आमचा पक्ष उभा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनिशी उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. कठीण प्रसंगात शिवसेना अधिक जोमाने एकसंघ होते. असेही हरी खोबरेकर म्हणाले.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते होते, मंत्री होते. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांचे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. मात्र शिंदे यांनी गद्दारी केल्यानंतर जेव्हा पक्ष निष्ठेचा विषय आला, त्यावेळी वैभव नाईक यांनी आपले व्यक्तिगत हितसंबंध बाजूला ठेवून मातोश्रीशी निष्ठा दाखवली. मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हाही अश्याच पद्धतीने शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. असेही खोबरेकर म्हणाले. २०१४ ला नारायण राणे यांच्या पराभव करून वैभव नाईक आमदार झाले. त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता होती. मात्र असलेल्या मंत्रीपदांमध्ये राज्याच्या सर्व भागांना प्रतिनिधी व जेष्ठ आमदार यांना संधी या निकषात आमदार वैभव नाईक यांना संधी मिळाली नाही. मात्र आमदार नाईक नेमहिच शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना मजबूत करत राहिले. त्यांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे. असे खोबरेकर यांनी सांगितले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या भगव्याशी एकनिष्ठ राहून पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असेही हरी खोबरेकर यांनी सांगितले.
शिवसैनिक कुठेही हलणार नाही : बबन शिंदे
अनेक आमदार तसेच काही खासदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असे असताना आमदार वैभव नाईक यांच्यासह खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, पालकमंत्री व अन्य अनेक नेतेमंडळी यांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचा कठीण काळ असला तरीही सिंधुदुर्गात 2005 पेक्षा चांगली परिस्थिती आहे. शिवसेनेत अनेक नव्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून नवीन आणि जुने कार्यकर्ते आज एकसंघ राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. सिंधुदुर्गातील कोणीही लोकप्रतिनिधी अन्यत्र गेला तरीही शिवसैनिक कुठेही हलणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले काही आमदार माघारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांनी सांगून पक्षसंघटनेत सर्वांनी एकत्रपणे राहून पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे हात बळकट करूया, असे आवाहन त्यांनी केले.
महिला शक्ती शिवसेनेच्या पाठीशी : पूनम चव्हाण
महिला संघटक पूनम चव्हाण यांनी आक्रमकपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्यात सध्या गलिच्छ राजकारण पहायला मिळत असल्याचे सांगितले. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर संकट उभे राहिले असताना केवळ मालवणातीलच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला शक्ती खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. या कठीण काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात आलेले अश्रू आम्ही वाया जाऊ देणार नाही. विरोधकांना या अश्रूंची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा चव्हाण यांनी दिला.





























































