
मुंबई पोलीस दलातील अंमलदारांच्या गुणवंत मुलांना सोमवारी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. जन सहयोग फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा हा गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख आणि मुंबई क्राईम ब्रँचच्या विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे.
जन सहयोग फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. यंदा सोमवारी दुपारी 3.30 वाजता आझाद मैदान येथील पोलीस क्लबच्या प्रेरणा हॉलमध्ये हा गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ आयोजित केला आहे. यावेळी पोलीस अंमलदारांच्या गुणवंत मुलांचा पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जन सहयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर पवार यांनी केले आहे.