नामिबियाहून आणलेल्या मादी चित्त्याचा कुनो नॅशनल पार्कमध्ये मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये साशा या मादी चित्त्याच्या मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तिची प्रकृती चिंताजनक होती. काही दिवसांपासू ही चित्ता थकलेली दिसत होती. तसेच ती अशक्त जाणवत होती. साशाला किडनीशी संबंधित काही आजार होते. आज अखेर तिचे निधन झाले. हिंदुस्थानात चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी ‘प्रोजेक्ट चीता’ सुरू करण्यात आला आहे. मात्र मादी चित्त sasha हिच्या मृत्यूमुळे आता या प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे.

17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात असलेल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये नाबिमिया येथून 8 चित्त्यांना विमानाने आणण्यात आले होते. या सर्व चित्त्यांना त्यांच्या नवीन घरात सोडण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः येथे आले होते. कुनो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नामिबियातील चित्त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.

जेव्हा साशाला गंभीर आजार असल्याचे आढळून आले तेव्हा मध्य प्रदेश वन विभागाच्या पथकाने इमर्जन्सी मेडिकल रिस्पॉन्स टीम श्योपूरमधील कुनो येथे पाठवली होती. जानेवारी महिन्यात साशाची प्रकृती खालावली. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत तिला जुलाब झाल्याचे स्पष्ट झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, हिंदुस्थानात येण्यापूर्वीच साशा किडनीच्या आजाराने त्रस्त होती.

वनविभागाने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, 22 जानेवारी रोजी देखरेख करणाऱ्या पथकाला मादी चित्ता साशा ही अशक्त दिसली. 3 पशुवैद्यकांनी साशाच्या प्रकृतीची तपासणी केली असता तिला उपचारांची गरज असल्याचे आढळून आले. यादरम्यान साशाच्या रक्ताचा नमुनाही घेण्यात आला. रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीत मादी बिबट्याला किडनीमध्ये संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर लगेच वनविहार राष्ट्रीय उद्यान भोपाळ येथील वन्यजीव डॉक्टर आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर अल्ट्रासाऊंड मशीनसह कुनो येथे पोहोचले. नामिबियातील साशाच्या उपचाराच्या इतिहासाची तपासणी केली असता, सशाला हिंदुस्थानात आणण्यापूर्वीच किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांच्या टीमने सांगितले.