
सामना प्रतिनिधी । मुंबई
बुलेट, पल्सर यासारख्या मोटरसायकल कशा चालवायच्या याचे तरुणींना प्रशिक्षण देणारी चेतना पंडीत (२७) हिने आज गोरेगाव येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. माझी काही ध्येय्य होती. पण ती पूर्ण करण्यात अपयशी ठरत होते. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे चेतना हिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटल्याचे दिंडोशी पोलिसांनी सांगितले.
दिंडोशी येथील एका अपार्टमेंटमध्ये चेतना अन्य तिघा तरुणींसह एका फ्लॅटमध्ये राहत होती. आज घरात कोणीच नसताना चेतना हिने पंख्याला गळफास लावून घेतला. त्या तिघींपैकी एक तरुणी घरी परतल्यावर तिने बराच वेळ डोअर बेल वाजवली. शिवाय चेतनाच्या मोबाईलवरदेखील फोन केले. मात्र आतून दरवाजा उघडला जात नसल्याने तिने बनावट चावी बनविणाऱ्याला बोलावून दरवाजा उघडून घेतला. दरवाजा उघडल्यावर आतमध्ये बघून त्या तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण चेतना गळफास लावलेल्या अवस्थेत होती. तिने लगेच शेजाऱ्यांना याबाबत सांगितले.
































































