
खिजगणतीत नसलेल्या मोरोक्को या आफ्रिकन देशाने फिफा वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठून इतिहास घडविला. आता उद्या त्यांच्या रडारवर असेल विद्यमान जगज्जेता फ्रान्स. फ्रान्सचा संघही आता मोरोक्कोला कमी लेखण्यास तयार नाहीये. कारण 3.67 कोटी लोकसंख्या असलेल्या या छोटय़ा आफ्रिकन देशाने वर्ल्ड कपसाठी दिवस-रात्र मेहनत घेतलेली आहे.
मोरोक्कोतील बहुतांश लोकं हे फ्रान्स, स्पेन व नेदरलॅण्ड्स या देशात स्थायिक झालेले आहेत, मात्र जेव्हा देशाची बाब असते तेव्हा हे सर्वजण एकवटतात. मोरोक्को संघातील हाकिम झियेच, सोफियान बाउफल, रोमेन सॅस, अचरफ हकिमी व यासिन बोनो हे स्टार फुटबॉलपटू परदेशातच जन्मले असून, तिकडेच ते परदेशी लीगमध्ये खेळत असतात. मात्र, प्रशिक्षक वालिद रेगरागुई यांनी या खेळाडूंची एकजूट केली. ऑगस्ट महिन्यातच त्यांनी या संघाचे प्रशिक्षकपद घेतले होते. याचबरोबर 1999पासून मोरोक्कोवर सत्ता असलेले किंग मोहम्मद सहावे यांनी देशात फुटबॉल संस्कृती रुजविण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. त्यांनी मोरोक्कोमध्ये फुटबॉल अकादमीसाठी अर्थसहाय्य केले. व्यावसायिक लीग सुरू केली. परिणामी आफ्रिकी चॅम्पियन्स लीगमध्ये मोरोक्कोने टय़ुनिशिया, मिस्त्र, नायजेरिया येथील क्लबला मागे टाकले.
मोरोक्कोला तुफान समर्थन
मोरोक्को संघातील खेळाडूंच्या या यशात फॅन्स व त्यांच्या कुटुंबीयाचा मोठा वाटा होय. मोरोक्कोने जेव्हा पोर्तुगालला हरविले तेव्हा सोफियान बाउफलच्या आईचे चक्क मैदानावर येत मुलाबरोबर डान्स केला. मोरोक्कोतील फुटबॉलप्रेमी मोठय़ा संख्येने कतारमध्ये आलेले आहेत. शिवाय, मोरोक्को हा आफ्रिकन देश असला तरी हा मुस्लिमबहुल देश आहे. त्यामुळे स्थानिक फुटबॉलप्रेमींचेही त्यांनी तुफानी समर्थन मिळत आहे. चार विजय व एक ड्रॉसह मोरोक्को संघ फिफा वर्ल्ड कपमधील अजेय संघ आहे. त्यामुळे फ्रान्सला रोखण्यासाठीदेखील मोरोक्कोचे खेळाडू सज्ज झाले आहेत.



























































