
सामना ऑनलाईन | समारा
सुपरस्टार नेमारच्या अफलातून कामगिरीने माजी विजेता ब्राझील संघ मेक्सिकोविरुद्ध जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोचल्यावरही फुटबॉल चाहत्यांनी नेमारला सोशिअल साईट्सवर ट्रोल केले. लढतीच्या ६९व्या मिनिटाला नेमारने छोट्या दुखापतीचा बाऊ करत मैदानात मोठी नाटकबाजी केली, अशी टीकाटिप्पणी फुटबॉल शौकिनांनी केली. नेयमारची हा अभिनय त्याला नक्कीच हॉलिवूडपटात काम मिळवून देईल असे मत अनेकांनी व्यक्त केले. मेक्सिकन बचावपटू लायूनचा हात हलकेच नेयमारच्या उजव्या पायाच्या घोट्याला लागला आणि सुपरस्टार नेयमारच्या ड्रामेबाजीला ऊत आला असे विनोद करत अनेक चाहत्यांनी सोशिअल साईट्सवर टाकत या सुपरस्टारला ट्रोल केले.
नेमारच्या मैदानातील अभिनयावर त्याचे चाहते बेहद्द खुश दिसले, तर टीकाकारांनी त्याच्या या कृतीवर चांगलेच तोंडसुख घेतले. एकाने ट्विटरवर म्हटले, नेमारचा मैदानातील अभिनय पाहून हॉलीवूडच्या एका नामांकित डायरेक्टरने त्याला आपल्या चित्रपटात भूमिका देऊ केली आहे. नेमारमध्ये भन्नाट अभिनयक्षमता असून तो बॉलीवूडपटात काम करून ऑस्करही मिळवू शकेल, असा विश्वासही या डायरेक्टरने व्यक्त केल्याचा विनोद या चाहत्याने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. हॉलीवूड तारका अन्ना हर्नांडेज हिनेही नेयमावर ट्विट करताना म्हटलं आहे, मैदानातील नेमारचा अभिनय पाहून मला माझ्या हट्टी बहिणीची आठवण झाली. घर स्वच्छ कर म्हटले की, तीही असेच काहीतरी दुखावल्याचे नाटक करते. एकाने तर मैदानात अभिनय करणारा नेमार क्षणभर मला विदूषकांसारखा वाटला असे मत व्यक्त करणारे ट्विट केले आहे.
नेमारच प्रतिस्पर्ध्यांच्या टार्गेटवर
यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंतच्या ४ लढतीत ब्राझीलच्या नेमारला रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी संघांनी जंग जंग पछाडले आहे. या चार सामन्यांत नेमारविरोधात विरोधी बचावपटूंनी २३ फाऊल नोंदवले आहेत. इतकी त्यांना नेमारची भीती सतावते आहे.
























































