
सामना ऑनलाईन । मॉस्को
रशियात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकात उपांत्यफेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध निर्णायक गोल करणारा मारियो मानजुकीच क्रोएशियासाठी हिरो ठरला आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रोएशियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. परंतु क्रोएशियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या मारियो मानजुकीच याने फुटबॉलचे बाळकडू जर्मनीमध्ये घेतले आहे.
FIFA 2018 : ऐतिहासिक विजयासह क्रोएशियाचा फायनलमध्ये प्रवेश
क्रोएशियामध्ये १९९१ ते १९९५ दरम्यान स्वातंत्र्ययुद्ध सुरू असताना त्याच्या आई-वडिलांनी त्याला जर्मनीमध्ये पाठवले होते आणि त्याच ठिकाणी मारियोने फुटबॉलचे प्रशिक्षण घेतले. जर्मनीत गेल्यानंतर मारियोने स्टटगार्ट जवळ असणारा जर्मन फुटबॉल क्लब टीएसएफ डिजिंजेनमधून खेळण्यास सुरुवात केली. तीन वर्ष तो जर्मनीमध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण घेत होता. १९९५ मध्ये क्रोएशियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मारियो स्वदेशी परतला होता. त्यानंतर १९९६ ते २००३ दरम्यान त्याने एनके मारसोनिया या फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व केले. २००५ मध्ये एनके जगरेब या संघाकडून खेळणाऱ्या मारियोने नंतर जर्मन क्लब बायर्न म्यूनिखचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर एटलेटिको माद्रिदकडूनही मारियो खेळला आणि सध्या तो इटलीच्या युवेंट्स या क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे. याच क्लबसोबत पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने नुकताच विक्रमी करार केला आहे.
क्रोएशियाच्या विजयानंतर खेळाडूने घेतले ‘याचे’ चुंबन
मारियो हा मैदानावर अत्यंत आक्रमण खेळ करण्यासाठी प्रसिद्ध आहे. दबावामध्ये खेळ उंचावणारा खेळाडू म्हणून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. अंडर-१६ पासून ते फुटबॉल विश्वचषक २०१८ पर्यंत त्याने दबावात संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यातही शेवटच्या १० मिनिटात गोल करत मारियोने संघाला विजय मिळवून दिला.





























































