FIFA WC Final 2022 मेस्सी मॅजिक… तब्बल 36 वर्षांनंतर स्वप्न साकार… अर्जेंटिना अजिंक्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या फुटबॉलसाठी ज्याचा जन्म झाला होता, तो लिओनल मेस्सीच अर्जेंटिनाचा मसीहा ठरला. मेस्सीच्या जन्मानंतर अर्जेंटिना कधीच जगज्जेता झाला नव्हता. अखेर अर्जेंटिनाचे जगज्जेतेपदाचे स्वप्न 36 वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर लिओनल मेस्सीच्याच कीकने साकार झाले. ब्लॉकबस्टर सामन्याचा थरारक शेवट पेनल्टी शूटआउटने झाला. गोंझालो मॉण्टिएलने पेनल्टी शूटआऊटमध्ये सलग चौथ्या पेनल्टीवर यशस्वी गोल करीत माजी जगज्जेत्या फ्रान्सचा 4-2 अशा फरकाने पराभव केला आणि अर्जेंटिनाच्या जगज्जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

अर्जेंटिनाने तिसऱयांदा जगज्जेतेपदाचा मान मिळविला. 1986 साली दियागो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अशी सुवर्ण कामगिरी केली होती. 2014 साली लिओनल मेस्सीला अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कप जिंकता आला नव्हता. 30 मिनिटांच्या जादा खेळात जर्मनीने गोल करून अर्जेंटिनाचा पराभव केला होता. पण आज मेस्सीने आपल्या जादुई खेळाच्या जोरावर कोटय़वधी अर्जेंटाईन जनता आणि चाहत्यांना वर्ल्ड कपची संस्मरणीय भेट दिली.

120 मिनीटांच्या क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकवणाऱया फायनलमध्ये अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात घनघोर किकयुद्ध रंगले. प्रत्येक वेळी अर्जेंटिनाने आघाडी घेतली आणि किलीयन एम्बाप्पेने फ्रान्सला चमत्कारिकरित्या बरोबरी साधून दिली. एम्बाप्पेने अंतिम सामन्यात गोलांची अनोखी हॅटट्रीक साजरी करत फ्रान्सचे जगज्जेते पदाचे मुकुट राखण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत केले, पण पेनल्टी शूटआउटमध्ये किंग्जले कोमान आणि ऑरिलियन चुआमेनीच्या हुकलेल्या पेनल्टीने त्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. तर एम्बाप्पे आणि कोलो मुआनी या दोघांनी यशस्वी पेनल्टी मारली. अर्जेंटिनाने जगज्जेते पदाला साजेसा शेवट करताना मेस्सीसह ऍलेक्सीज ऍलिस्टर, लिआंद्रो पॅरेडेझ आणि गोंझालो मॉण्टिएल यांनी फ्रान्सच्या गोलपोस्टला भेदले.

शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा…

सामन्याचा पहिला हाफ अर्जेंटिनाचा होता. फ्रान्सचा डम्बेल टॅकल करत असताना डी मारिया बॉक्समध्ये पडला आणि रेफ्रीने अर्जेंटिनाला पेनल्टी दिली. लिओनल मेस्सीने मिळालेली संधी न दवडता अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीनंतर अर्जेंटिनाचा उत्साह द्विगुणित झाला. 23 व्या मिनिटाला पहिला गोल ठोकल्यानंतर एंजल डी मारियाने 36 व्या मिनिटाला दुसरा गोल ठोकला आणि अर्जेंटिनाला 2-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. या आघाडीनंतर अर्जेंटिना पूर्ण वेळेतच सामना संपविणार असे वाटत होते, पण 80 व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली आणि एम्बाप्पेने गोल ठोकून फ्रान्सच्या जीवात जीव आणला. या गोलनंतर दुसऱया मिनिटाला दुसरा गोल डागद एम्बापेने फ्रान्सला बरोबरी साधून दिली आणि उत्कंठा आणखी वाढली. ज्यादा वेळेत 108 व्या मिनिटाला पुन्हा मेस्सीच धावून आला आणि त्याने पेलेंची बरोबरी साधणारा वर्ल्ड कपमधील 13 वा गोल ठोकला. पण पेनल्टीवर एम्बाप्पेने गोल डागून फ्रान्सच्या आशा जिवंत ठेवल्या.

पराभवानंतरही अर्जेंटिना नॉनस्टॉप

सौदी अरेबियाविरुद्धचा सलामीचा सामना सोडला तर उर्वरित सहाही सामन्यात अर्जेंटिनाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर 2-0 आघाडी घेण्याची परंपरा अंतिम सामन्यातही कायम ठेवली. अर्जेंटिनाने सलामीच्या सामन्यात सौदीविरुद्ध पहिला गोल ठोकला, पण पुढील दोन्ही गोल सौदीने ठोकले आणि अर्जेंटिना सलामीलाच हरले. मात्र त्यानंतर झालेल्या प्रत्येक सामन्यात अर्जेटिनाने 2-0 आघाडी घेतली. त्यांनी मेक्सिकोवर आणि पोलंडचा 2-0 ने पराभव करीत बाद फेरीत स्थान मिळविले. या दोन्ही साखळी लढतीत त्यांनी दोन्ही गोल हाफटाइमनंतर ठोकले. मग बाद फेरीत ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव करताना 2-0 अशी आघाडी घेतली होती. नेदरलॅण्ड्सविरुद्धही ते 2-0 ने पुढे होते आणि हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. मग पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना जिंकली. उपांत्य फेरीतही ाढोएशियाविरूद्ध त्यांनी पहिल्या सत्रात 2-0 अशी आघाडी घेतली होती आणि मग हा सामना 3-0 ने जिंकला. अंतिम सामन्यातही अर्जेंटिनाने हाफटाइम आधीच 2-0 चा कित्ता गिरविला. पण हाफटाइमनंतर एका मिनिटात एम्बाप्पेने दोन गोल करून सामन्यात बरोबरी साधली.

कोटी कोटी उड्डाणे

जगज्जेता संघ – 347 कोटी रुपये
उपविजेता संघ – 248 कोटी रुपये
क्रोएशिया (तिसरा क्रमांक) – 223 कोटी रुपये
मोरोक्को (चौथा क्रमांक) – 206 कोटी

मेस्सीचा गोल्डन डबल

2014 साली गोल्डन बॉल जिंकणाऱया लिओनल मेस्सीने यंदाही तीच कामगिरी करत गोल्डन बॉल जिंकण्याचा डबल धमाका केला. तो ही कामगिरी दोनदा करणारा एकमेव खेळाडू आहे.

एम्बाप्पेला गोल्डन बूट

अंतिम सामन्यात हॅटट्रीक करण्याचा पराक्रम करणाऱया किलियन एम्बाप्पेने स्पर्धेत सर्वाधिक 8 गोल ठोकत गोल्डन बूट जिंकला.

मार्टिनेजला गोल्डन ग्लोव्हज्

अर्जेटिनाच्या यशात मोलाची कामगिरी करताना अनेक गोल रोखणाऱया इमिलानो मार्टिनेजला गोल्डन ग्लोव्हज्ने सन्मानित करण्यात आले.

फर्नांडेझ युवा स्टार

कमी वयात 2 गोल ठोकण्याची करामत करणारा अर्जेंटिनाचा 21 वर्षीय एन्जो फर्नांडेझ स्पर्धेतील सर्वोत्तम तरुण खेळाडू ठरला.