
>>नवनाथ दांडेकर । मुंबई
जगातील अब्जावधी क्रीडा शौकिनांच्या आवडीच्या फुटबॉल महाकुंभाच्या २१व्या सत्राचा शानदार प्रारंभ गुरुवारी रात्री झाला. जगभरातील ३ अब्ज फुटबॉलशौकिनांनी आपल्या लाडक्या खेळाच्या विश्व चषकाची आनंददायी सुरुवात पाहत धन्यता मानली. भव्यदिव्य क्रेमलिन राजवाड्याच्या कुशीत वसलेल्या रशियाच्या मॉस्को शहराने सलामीच्या विश्वचषक लढतीचे यजमानपद अगदी सार्थपणे भूषवले. महासत्ता रशियाच्या या राजधानीत यंदाच्या विश्व चषकाची अंतिम लढत याच प्रसिद्ध लुझनिकी स्टेडिअमवर खेळवली जाणार आहे.
३२ टॉपमोस्ट संघांचा सहभाग असलेल्या या विश्वचषकाचाच उद्घाटन सोहळा भव्यदिव्य आणि रंगारंगच होता. जगविख्यात पॉप गायक रोबी विलियम्स याने गायिलेल्या ”लेट मी एन्टरटेन यू” या शुभारंभी गीताने स्टेडिअमवर उपस्थित ८० हजार आणि टीव्हीवर सलामीची लढत पाहणाऱ्या सुमारे ३ अब्ज फुटबॉलशौकिनांना खुश केले. या गीतावर परफॉर्म केले रशियन लोकप्रिय पॉप नर्तिका आयडा गरीफुलीना हिने. ५०० रशियन नर्तकांसोबत दोन विश्वचषक गाजवणारा पोर्तुगालचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो याचे दर्शन फुटबॉल शौकिनांना तुफान भावले.
देशातील क्रीडापटूंवरील उत्तेजक सेवन, स्कँडलचा कलंक पुसून टाकण्याच्या निर्धाराने रशियन फुटबॉल महासंघाने या विश्वचषकाचे आयोजन केले आहे. साम्यवादी राजवटीच्या पोलादी जोखडातून बाहेर पडलेल्या रशियाने या आयोजन आजही आपण महासत्ता असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. जागतिक फुटबॉल महासंघानेही (फिफा) रशियाच्या या दिलेरीला दाद देत रशियातील हि विश्वचषक स्पर्धा संस्मरणीय होणार असल्याचे निक्षून सांगितले आहे. यजमान रशियन संघानेही सलामीच्या लढतीत सौदी अरेबियाचे आव्हान ५-० असे सहज परतावून आपल्या विजयी दौडीला प्रारंभ केलाय. एकूण हा विश्वचषक क्रीडाशौकिनांच्या कायम स्मरणात राहील याची नांदीच स्पर्धेच्या शुभारंभाने दिली आहे.
बुकींनी दिली ब्राझिलला पसंती…
२१व्या फुटबॉल विश्वचषक जेतेपदाची शर्यतीत गतविजेता जर्मनी, माजी विजेता फ्रान्स आणि स्पेन या संघाना फुटबॉल चाहत्यांनी अग्रपसंती दिली आहे. मात्र जगातील नामवंत बुकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विलियम हिल, स्काय बेट आणि पॅडी पॉवर यांनी नेयमार (जुनिअर) याच्या ब्राझील संघाला विजेतेपदासाठी अग्रपसंती दिली आहे. एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकाने घेतलेल्या जनमत चाचणीत ६३ हजारावर फुटबॉल शौकिनांनी गतविजेता जर्मनी आणि माजी विजेता अर्जेन्टिना व ब्राझील या संघांना मोठी पसंती दर्शवली आहे. गोल्डन बूटसाठी नेयमार टॉपवर असून त्याच्या पाठोपाठ सुपरस्टार मेस्सी, रोनाल्डो हे असल्याचे मत या फुटबॉलशौकिनांनी व्यक्त केली.
यजमान समर्थपणे पेलणार आयोजनाचे शिवधनुष्य
ए , बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच अशा ८ गटांत जगातले ३२ नामवंत फुटबॉल संघ यंदा झुंजणार आहेत. यजमान रशियाने या फुटबॉल महाकुंभाचे यजमानपद समर्थपणे पेलण्याच्या निर्धाराने तयारी केली आहे. फिफानेही आपले ठोस समर्थन यजमान देशाला दिल्याने हा विश्वचषक निश्चितच गाजणार यात शंका नाही. रशियन सम्राट झारने उभारलेल्या जगप्रसिद्ध क्रेमलिन राजवाड्याच्या छायेत पार पडणारा यंदाचा २१वा फुटबॉल विश्वचषक नक्कीच ऐतिहासिक ठरणार यात शंकाच नाही. सुमारे महिनाभर चालणारी ही स्पर्धा जगातील अब्जावधी फुटबॉल शौकिनांसाठी आगळी मेजवानीच ठरणार आहे.



























































