रंगपंचमी खेळताना दोन गटात हाणामारी, 9 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, शिरोळ

शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे रंगपंचमी खेळत असताना रंग लावण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील 9 जण जखमी झाले आहेत. तर 19 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हाणामारीत दगड, लोखंडी हुक, काठ्यांचा वापर करण्यात आला. सोमवारी ही घटना घडली.

दरम्यान भांडण सोडविण्यासाठी गेले असता जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या घरात शिरकाव करून प्रापंचिक साहित्याची मोडतोड केल्याची फिर्याद सरपंच काजल कांबळे यांनी 19 जणांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. या घटनेमुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याप्रकरणी अमोल पालकर, स्वप्नील शिंदे, श्रावण पाटील, संजय देसाई, जालेंद्र सांडगे, अक्षय शिंदे, किसन जाधव, गोट्या खांडेकर, योगेश ऐवळे, मारुती शिंदे, शांताबाई खांडेकर, तेजस्विनी जाधव, बाळाबाई पालकर, विमल शिंदे, जया शिंदे, राजेश्री जिरगाळ, ज्योती शिंदे, रूपाली उगळे, पद्मावती बेळगे, (सर्व रा. तेरवाड) यांच्यावर कुरुंदवाड पोलिसात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की आज दुपारी साडेअकरा वाजता सुमारास तेरवाड येथे रंगपंचमी खेळत असताना दोन गटात वाद झाला या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले दगड, काठी, कुऱ्हाड, कोयत्याने सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सरपंच कांबळे यांनाच जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याची मोडतोड करत नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हाणामारीत अरुण नल्ला, रोहित माने, संजय माने, शकील घोरी, अल्लाउद्दीन घोरी, विक्रम कांबळे, अंबादास अडम, राजू बेग, पुनम कांबळे (सर्व रा.तेरवाड) हे जखमी झाले आहेत. जखमीवर कुरुंदवाड व सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही गटातील जखमी असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तेरवाड येथे तणावपूर्ण वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.