
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दोन गडामध्ये लोखंडी गज आणि तलवारीने तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वाळुचे ट्रॅक्टर पकडून दिल्याने दोन गटात हा वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्डा येथील धोत्रे व सुरवसे या दोन गटांमध्ये जुना वाद होता. याचेच रुपांतर हाणामारीमध्ये झाले. या हाणामारीमध्ये रावसाहेब अण्णा सुरवसे, सागर अण्णा सुरवसे, योगेश अण्णा सुरवसे, अंकुश बाजीराव धोत्रे हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
सागर अण्णा सुरवसे यांनी या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंकुश बाजीराव धोत्रे, राजु अंकुश धोत्रे, पप्पु अंकुश धोत्रे, दिनेश अंकुश धोत्रे, शिवाजी बाजीराव धोत्रे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी वर लोखंडी गजाने मारहाण केली, तसेच तलवारीने जीवे मारण्याची धकमी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दुसरी फिर्याद अंकुश बाजीराव धोत्रे यांनी दिली असून योगेश अण्णा सुरवसे, रावसाहेब अण्णा सुरवसे, सागर अण्णा सुरवसे यांच्यासह आठ ते दहा जणांनी वाळूचे ट्रॅक्टर पकडून दिल्याचा आरोप करत मारहाण केल्याचा आरोप केला.
दरम्यान, परस्परविरोधी फिर्यादीवरून वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील राजु अंकुश धोत्रे, दिनेश अंकुश धोत्रे, पप्पु अंकुश धोत्रे, अंकुश बाजीराव धोत्रे आणि सागर अण्णा धोत्रे अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


























































