
रोज लोक मरताहेत, प्रचंड हिंसाचार सुरू आहे, मदत शिबिरांमध्ये जेवण, पाणी मिळत नाही, मुलं शाळेत जात नाहीत, त्यांच्या भवितव्याची चिंता लागून राहिली आहे. गेल्या वर्षभरापासून मणिपूर जळतेय, येथील लोक खूप अडचणीत आहेत. आम्हाला शांतता हवीय… मोदीजी, एकदा तरी मणिपूरमध्ये या, लोकांशी चर्चा करा, येथील विदारक परिस्थिती पाहा… अशी भावनिक साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालताना मार्शल आर्ट फाईटर चॅम्पियन चुंगरेंग कोरेनच्या अश्रूंचा रिंगमध्येच बांध फुटला. चुंगरेंगचा हा व्हिडीयो प्रचंड व्हायरल झाला आहे.
मणिपूर जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुटुंबाचा भाग असते तर येथील लोकांना आज रडावे लागले नसते. अशा शब्दांत युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
अहवाल देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराच्या प्रकरणी दाखल केलेली आरोपपत्रे आणि तपासाची प्रगती याची सविस्तर माहिती देणारे अहवाल सादर करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर सरकार, सीबीआय आणि एनआयए यांना दिले. हिंसाचाराचे खटले आसाममध्ये चालवावेत की मणिपूरमध्ये याचा निर्णय घ्यायला या अहवालांची मदत होईल, असे कोर्टाने म्हटले आहे.



























































