परतूरला दोन गटांत हाणामारी

44
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । परतूर

शहराच्या गाव भागात मंगळवारी रात्री ९च्या सुमारास मुस्लिमांच्या दोन गटांत हाणामारी झाल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हातात लाठ्या-काठ्या घेऊन जमाव जमल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. अशरफ कायमखानी यांच्या तक्रारीवरून ६ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तर रात्री उशीरापर्यंत आंबा रोड भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

परतूरच्या गाव भागातील भाजीमंडई भागात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास कायमखानी व कुरेशी या दोन गटांत गल्लीत का येतो या कारणाने वाद वाढत जाऊन हाणामारी झाली. लाठ्याकाठ्या व हत्यारासह मोठा जमाव जमा झाल्याने व्यापाऱ्यांनी भीतीने दुकाने बंद केली. एरव्ही पोलीस स्टेशन चौक, दसमले चौक व भाजीमंडई भाग हा भाग रात्री ११ ते १२ पर्यंत गजबलेला असतो. मात्र हाणामारीच्या घटनेनंतर ९ नंतर दुकाने बंद होऊन शुकशुकाट पसरला होता. पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत बंदोबस्तात मोठी वाढ केल्याने शहरात कुठेही तणाव दिसला नाही.

अशरफ कायमखानी यांच्या तक्रारीवरून कुरेशीच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार भुरेवाल करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या