मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा, जनआक्रोश समितीचा गणेशोत्सवात आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 17 वर्षे रखडलेले आहे. महामार्गाच्या कामातील मोठा भ्रष्टाचार आणि सरकारच्या अनास्थेमुळे 15 वर्षांत या महामार्गावर 4531 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे अपघाती मृत्यू नसून सरकारने केलेले खून आहेत. त्यामुळे सत्ताधाऱयांसह संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱयांवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने केली आहे. याच पार्श्वभूमीवर समिती गणेशोत्सवाच्या दिवसांत कोकणातील प्रमुख तालुक्यांत अनोखे आंदोलन करणार आहे.

उच्च न्यायालयाने वेळोवेळी सक्त आदेश दिल्यानंतरही सरकारने मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण व इतर कामांना गती दिली नाही. त्यामुळे कोकणी जनतेचा जीवघेणा रस्ते प्रवास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली आणि महामार्गाच्या कामातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. याचवेळी सरकारचे कान आणि डोळे उघडण्यासाठी गणेशोत्सवाच्या दिवसांत अनोखे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांतील प्रमुख तालुक्यांत ‘मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा’ असा उत्सव साजरा केला जाईल. त्यानंतर अकराव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आंदोलन करणार आहोत, असे समितीतर्फे अशोक वालम यांनी जाहीर केले. यावेळी समितीचे अध्यक्ष अजय यादव, संजय जंगम, सुरेंद्र पवार आदी पदाधिकारी व कोकणवासी नागरिक उपस्थित होते.

95 टक्के काम केल्याचा दावा पूर्णपणे खोटा!

सरकारने मुंबई-गोवा महामार्गाचे 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे, मात्र हा दावा पूर्णपणे खोटा आहे. प्रत्यक्षात 50 टक्केच काम पूर्ण झाले असून त्यातही भ्रष्टाचारामुळे रस्त्याची पावसाळय़ात दुर्दशा झाली आहे. महामार्गाचे निकृष्ट काम आणि दिरंगाई केल्याबद्दल संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींवर खुनाचे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी जनआक्रोश समितीने पत्रकार परिषदेत केली. तसेच अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याचीही मागणी करण्यात आली.