विचारा तर खरं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

प्रश्न 1 : शेअर बाजाराने उच्चांक गाठल्याने माझी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक उत्तम परतावा देत आहे. ती काढून घेऊन फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवावी आणि बाजार खाली आल्यावर पैसे पुन्हा गुंतवावे असा विचार मनात येतो. नेमके काय करावे?
 आनंद खाडिलकर, विक्रोळी, मुंबई

उत्तर : आपल्याला उत्तम परतावा मिळत आहे. पण जोपर्यंत आपण विक्री करत नाही, तोपर्यंत दिसणारा फायदा हा आभासी आहे. जर आपण तो काढून घेतलात तर त्यात एक लाखाहून अधिक होणाऱया दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 10 टक्के आणि अल्पकालीन नफ्यावर 15 टक्के या सवलतीच्या दराने कर आकारणी होईल, जी वाजवी आहे. राहता राहिले ते फिक्स डिपॉझिटवर मिळणाऱया व्याजावर कर द्यावा लागेल. याला अनेक स्मार्ट पर्याय आहेत. आर्थिक वर्षात यातील जास्तीत जास्त प्रत्येकी दीड लाख रुपये आपण आपल्या आणि जोडीदाराच्या पीपीएफ खात्यात ठेऊ शकाल, त्यावर करमुक्त व्याज मिळेल. जुने खाते असेल तर युनिट खरेदी करण्याच्या वेळी आपल्याला खात्यातून रक्कम काढून घेता येईल. एनपीएसचे खाते असल्यास त्यातील टियर वन खात्यात पन्नास हजार रुपये भरून अधिकची करदेयता कमी करता येईल. उरलेली रक्कम टियर टू खात्यात ठेवल्यास ती म्युच्युअल फंडाच्या बॅलन्स योजनेनुसार कार्य करत राहील आणि जरुरीनुसार काढता येईल. म्युच्युअल फंडाच्या ईएलएसएस योजनेत गुंतवणूक केल्यास रक्कम इतर करबचत योजनांच्या कालावधीपेक्षा कमी व तीन वर्षे अडकून राहील. एनपीएस आणि ईएलएस योजनांना पैसे भरण्यासाठी वरची मर्यादा नाही. असे पर्याय आहेत ज्यामुळे मिळणारा फायदा सुरक्षित राहून एकूण करदेयता कमी होईल.

प्रश्न : 2 डी मॅट खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनी खात्यातील शेअर्स त्यांच्या नावे होण्यासाठी काय करावे?
 सुरेश आपटे, बदलापूर

उत्तर : डी मॅट खाते एकाच व्यक्तीच्या नावावर अथवा सहधारकासह असू शकते. जर सहधारक नसेल तर या खात्याच्या वारसदारास शेअर ट्रान्समिशन फॉर्म भरून देऊन सोबत धारकाचा मृत्यू दाखला आणि वारसदाराच्या ज्या खात्यात ते शेअर्स ट्रान्सफर करायचे त्याची क्लायंट मास्टर लिस्ट द्यावी लागेल. यानंतर सर्व शेअर्स वारसाच्या डी मॅट खात्यात वर्ग करून खाते बंद होईल. जर सहधारक असेल तर याच पद्धतीने सर्व शेअर्स वारसदारांऐवजी सहधारकास मिळतील.

वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.