
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आरक्षित डब्यातून अव्वाच्या सव्वा सामान घेऊन जाणे प्रवाशांना महागात पडणार आहे. विमान प्रवासाप्रमाणेच रेल्वेप्रवासातही सामानाच्या ने- आणीवर मर्यादा घालण्याचा विचार भारतीय रेल्वे करत आहे. यासाठी ८ जून ते २२ जून पर्यंत रेल्वे एक अभियान राबवणार आहे. याअंतर्गत रेल्वेप्रवासात भरमसाठ सामान घेऊन जाणाऱ्यावर नजर ठेवण्यात येणार आहे.
या नवीन अभियानाअंतर्गत प्रथम श्रेणीच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ७० किलो वजन बसेल एवढेच सामान नेण्यात येणार आहे. यात १५ किलोंची अतिरिक्त सवलत प्रवाशांना देण्यात येणार आहे. तर द्वितीय श्रेणी वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५० किलो सामान नेता येणार आहे. तसेच जास्तीत जास्त १० किलोंची सवलत त्यांना देता येणार आहे. तर तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यातून प्रवास करणाऱ्यांना ४० किलोपर्यंत सामान नेता येईल व अतिरिक्त सामानासाठी १० किलोंची सवलत देण्यात येणार आहे. तसेच स्लीपर कोचमध्ये ४० किलो सामान नेण्यास परवानगी असून जनरल डब्यात प्रवाशांना ३५ किलो सामान नेता येणार आहे.



























































