ड्रोन ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल 

drone

सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीने शहरात ड्रोनवर मुंबई पोलिसांनी बंदी आणली आहे. बंदी असतानाही वांद्रे येथे लग्नात ड्रोन उडवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी ड्रोन ऑपरेटरविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती असल्याने मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. दोनच दिवसांपूर्वी साकीनाका येथे ड्रोन दिसल्याच्या अफवेने पोलिसांनी तारांबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी शहरात ड्रोन, हॉट एअर बलून उडवण्यास बंदी आणली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

शनिवारी बीकेसीच्या फटाका मैदानात ड्रोन दिसल्याची माहिती बीकेसी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे गेले. फटाका मैदानात लग्न सोहळा असल्याने तेथे एक जण ड्रोन उडवत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी पंचनामा करून तो ड्रोन ताब्यात घेतला. ड्रोन ऑपरेटरविरोधात बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंद केला.