जालन्यातील औद्योगिक वसाहतीतील गजकेसरी स्टील कंपनीत आग; जिवीतहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील या कंपनीत सोमवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. कंपनीमध्ये बाजूला ठेवलेले तारपीन कार्पेट वायर रोप आणि भंगार याच्यावर भट्टीमधून ठिणगी पडली. ठिणगी थेट वायर रोपवर पडल्याने आगीची तीव्रता वाढली. पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आग वाढतच गेली.

कंपनी व्यवस्थापनाने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत वायररोप, कार्पेट, तारपीन, लोखंडी डस्ट, भंगार इत्यादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. सुमारे 4 तासाच्या अथक प्रयत्नाने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागलेले भंगार, लोखंडी डस्ट, वायर तसेच इतर सामान यांना कुलींग करण्याचे काम 5 वाजेपर्यंत चालू होते.

आगीमध्ये जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन संतोष काळे,विठ्ठल कांबळे, नागेश घुगे, संदीप दराडे तसेच वाहन चालक अशोक वाघमारे यांनी शर्थीचे प्रयत्न केले.