कोपरगाव कारागृहातील चादरी गाद्या जळून भस्मसात; जिवीतहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील कारागृहाचे काम चालू असल्याने एका खोलीत ठेवलेले कैद्यांच्या गाद्याचादरी जुने सामान अचानक लागलेल्या आगीने जळून भस्मसात झाले. सुदैवाने कैदी कारागृहात नसल्याने मोठा अनर्थ टळला. ही आग कशामुळे लागली अद्याप कारण समजू शकले नाही.

शहरातील तहसिल कार्यालयाच्या आवारात कारागृहाची जुनी इमारत असून त्या इमारतीत दुय्यम कारागृह त्यात चार बाराकी आहेत. येथे विविध गुन्ह्यातील गुन्हेगाराना ठेवण्यात येत होते. मात्र सध्या कारागृहाच्या डागडूजी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तेथील कैद्यांना इतरत्र हलविण्यात आल्यामुळे त्या इमारतीत फक्त जुने सामान आहे. तसेच छतावरील कौलेही काढले आहेत. या इमारतीतील एका खोलीतुन रविवारी रात्री 10.15वाजण्याच्या सुमारास धुराचे लोळ निघत असल्याचे तहसिल कार्यालयाजवळून घरी जाणारे शहरातील टिळक नगर भागातील तरुण अनिल वैरागळ,सिद्धार्थ वाघमारे यांच्या गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बघितले की त्या खोलीत असलेल्या गाद्या, जुने कपडे व तेथील जुन्या सामानाला आग लागली आहे. अनिल त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तहसिल आवारातील पाण्याच्या टाकीतुन पाणी आणून ती आग विझविण्याचा प्रत्यन केला. मात्र, आग वाढत असल्याने नगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येऊन ती आग विझविण्यात आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या कारागृहालगतच ट्रेजरी ऑफिसची मोठी तिजोरी आहे. त्यात स्टॅम्प वगैरे इतर साहित्य ठेवले जाते. तातडीने आग विझेवल्याने त्यास कोणताही धक्का लागला नाही, असे प्रभारी तुरुंग निरीक्षक चंद्रशेखर कुलथे यांनी सांगितले.