फाटलेल्या आभाळाखाली अग्निशमन दलाने उपसला दुःखाचा डोंगर, विक्रोळीमधील रेस्क्यू ऑपरेशनचा थरार 

ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टर जेवढा आटापिटा करतो तितकाच आटापिटा विक्रोळीत दरडीमुळे गाडल्या गेलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मुंबई अग्निशमन दलातील जवानांनी केला. एक सेकंदाच्या मदतीनेही कोणाचे प्राण वाचू शकतात, याचे भान असलेल्या विक्रोळी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ  करत दुःखाचा डोंगर उपसला.

मुंबईत शनिवार, 17 जुलैच्या रात्रीपासून कोसळणाऱया पावसाने कहर केला. विक्रोळीतील सूर्यनगरमध्ये मध्यरात्री अडीचच्या सुमाराला दरड कोसळली आणि हा कहर अधिक जीवघेणा झाला. सूर्यनगरमध्ये दरड कोसळून तिथे 6 घरे जमिनीखाली गाडली गेली, असा कॉल विक्रोळी अग्निशमन दलाला आला असता 70 ते 80 फूट उंच, 2 ते 3 फुटांच्या अरुंद गल्ल्यांना पार करत जवान  घटनास्थळी पोहोचले.

विजेवर चालणारी उपकरणे खाली ठेवत अंधाऱया, निसरडय़ा कच्च्या रस्त्याने हातात फावडे, पहार, कुदळी यासह काही मोजके साहित्य घेऊन जवानांचे पथक घटनास्थळी पोहोचले. ढिगारा उपसताना अडकून पडलेल्यांना काही इजा होऊ नये, याची काळजी घ्यावी लागत होती. त्यामुळे बचावकार्याची गती कमी होत होती. सुमारे 13 ते 14 तास चाललेल्या या बचावकार्यावेळी एक एक करून जवानांनी 10 मृतदेह बाहेर काढले तर एकाला वाचवण्यात जवानांना यश आले. सोबतीला इतर अग्निशमन पेंद्रांचे जवान आणि एनडीआरएफची टीमही होती. दरम्यान, ढिगारा उपसताना एकाच कुटुंबातील काही व्यक्ती सापडल्याने आमच्या सगळ्यांची हृदये हेलावली. मात्र, भावनांना आवर घालत जड अंतःकरणाने आमची टीम कर्तव्य बजावत होती, असे अग्निशमन दलाच्या महिला जवान निशाद शेख यांनी सांगितले.

अंधारात, मुसळधार पाऊस असताना झालेल्या दुर्घटनेवेळी अग्निशमन दलाला मदत आणि बचावकार्य करताना निसर्गाशी सामना करावा लागतो. ढिगारा उपसताना सर्व प्रकारची काळजी घेत बचावकार्य करावे लागले. निसर्गाइतकीच चिकाटी जवानांनीही दाखवली.

– हरिश्चंद्र गिरकर, विभागीय अग्निशमन दल अधिकारी 

पाऊस नसताना ज्यावेळी भिंत किंवा घर कोसळते त्यावेळी गाडल्या गेलेल्या व्यक्ती वाचण्याची शक्यता असते. त्यांना श्वास घ्यायला कुठेतरी पोकळी शिल्लक राहते. मात्र, पावसाळ्यात माती ओली होते, त्याचा चिखल होतो. अशा वेळी ही पोकळी बुजते आणि त्यामुळे आत अडकलेल्या व्यक्तींचा दुर्दैवाने मृत्यू होतो. चेंबूर आणि विक्रोळीतील घटनांमध्ये दुर्दैवाने हेच घडले.

– हेमंत परब, मुंबई अग्निशमन दल प्रमुख

आपली प्रतिक्रिया द्या