
सामना ऑनलाईन । भिवंडी
भिवंडी येथील गोदाम पट्टय़ात गेल्या पंधरा दिवसांपासून आगी लागण्याचे सत्र अजून सुरूच आहे. रात्री ओवळी ग्रामपंचायत हद्दीत ग्लोब कॉम्प्लेक्समध्ये जपानच्या आंतरराष्ट्रीय हिताची इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या टोलेजंग गोदामाला भीषण आग लागून कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
सुदैवाने गोदाम बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी दत्ता साळवी यांनी जवानांसह घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र आगीचे रौद्ररूप पाहता कल्याण आणि ठाणे, उल्हासनगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती पोलीस तपासाअंती मिळणार असली तरी या गोदाम पट्टय़ामध्ये सतत लागणाऱ्या आगींतून संशयाचा धूर निघत आहे. इन्शुरन्स मिळवण्यासाठी या आगी लावल्या जात असाव्यात असाही कयास व्यक्त केला जात आहे.
























































