गोंडपिपरीच्या रासबिहारी जिनींगला आग; कोट्यवधींचे नुकसान, आग विझविण्याचे प्रयत्न सुरू

गोंडपिपरीतील धानापूर परिसरात असणाऱ्या रासबिहारी जिनींगला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग विझविण्यासाठी चंद्रपूर,बल्लारपूर,राजूरा,पोंभुर्णा,अहेरी येथील सहा अग्नीशमन दलाच्या गाडयांना पाचारण करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत आगीने रूद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती कळताच तहसिलदार के.डी.मेश्राम यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा आढावा घेतला. आगीच्या घटनाची माहिती कळताच अनेकांनी धावाधाव केली.यादरम्यान झालेल्या अपघातात एका मजुराचा पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही जिनींग प्रेमलता गोनपल्लीवार,आनंदीदेवी सारडा यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या