
सामना प्रतिनिधी । लातूर
रेणापूर तालूक्यातील पानगाव शिवारात उसाच्या पाचटासोबत शेजाऱ्याच्या शेतातील स्प्रिंक्लरचे पाईप, तीन ट्रॅक्टर सरपण असा सुमारे 60 हजार रुपयांचे साहित्याचे जळून खाक झाले आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गोविंद कोंडिबा चिताडे (रा.येलम गल्ली पानगाव) यांनी तक्रार दाखल केली. पानगाव शिवारात गट नंबर 161 मधील शेतीमध्ये ऊसाची लागवड केलेली होती. ऊसाला पाणी देण्यासाठी स्प्रिंक्लरचा सेट आणि त्याच्या बाजूला तीन ट्रॅक्टर सरपण गोळा करुन ठेवलेले होते. सुदर्शन विठोबा चिताडे यांनी त्यांच्या शेताताल ऊसाचा पाचटाला जाळ लावला त्यामुळे फिर्यादीच्या शेतातील स्प्रिंक्लरचे पाईप, सरपण आणि लागवड केलेला ऊस जळून सुमारे 60 हजाराचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलीसांनी सुदर्शन विठोबा चिताडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.




























































