
सामना प्रतिनिधी । कवठे येमाई
शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या भिल्ल वस्तीत सोमवारी सायंकाळी 4 च्या सुमारास एका झोपडीस आग लागली. वेगवान वाऱ्यामुळे इतर 4 झोपड्यानाही आगीने घेरले. या घटनेत 3 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी हजार झाले. काही वेळात ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. पण तोपर्यँत सर्व झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या.
सोमवारी सायंकाळी लागलेल्या या आगीमध्ये एका झोपडीत झोपलेल्या 2 चिमुरड्यांसह एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका महिलेच्या हातास गंभीर भाजल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रांजल अरुण पवार (2), दादू लालू गावडे (3) व लालू आनंदा गावडे (35) यांचा घटनेत जागेवरच होरपळून मृत्यु झाला आहे. तर पिन्हाबाई लालू गावडे (30) वर्षे या महिलेचा घटनेत उजवा हात भाजल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. शिरूर पोलीसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत पंचनाम केला असून पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

























































