
मुंबईतील 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून ‘अग्निसुरक्षा शुल्क’ घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये प्रति चौरस मीटर सुमारे 10 ते 15 रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाणार आहे. ताबा प्रमाणपत्र देताना विकासकाकडून हे शुल्क एकदाच घेतले जाणार आहे. मात्र एकाच वेळी आकारण्यात येणाऱया शुल्काच्या एक टक्का शुल्क प्रत्येक वर्षी संबंधित मालकाला भरावे लागेल अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.
पालिकेने विधी खात्याच्या सल्ल्यानुसार आपल्या विशेषाकारात अग्निसुरक्षा शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रहिवासी इमारती, हॉटेल, व्यावसायिक आस्थापने यांचे अग्निसुरक्षा शुल्क वेगवेगळे असेल. 6 जून 2015 नंतर म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा अन्य प्राधिकरणांच्या अखत्यारीत असणाऱया इमारतींसाठीही अग्निसुरक्षा शुल्क लागू राहणार असल्याचेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वसूल होणाऱया रकमेचा उपयोग अग्निशमन दलाचे अद्ययावतीकरण, ‘मजबुतीकरणा’साठी केला जाणार असून काही ठराविक रक्कम राज्य सरकारलाही दिली जाणार आहे.
सद्यस्थितीत मुंबईकरांवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काचा भार टाकणे योग्य ठरणार नाही. त्यामुळेच शिवसेनेने मालमत्ता करवाढ आणि पाणीपट्टी करवाढीला विरोध करून दरवाढ रोखली आहे अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.


























































