
सामना प्रतिनिधी । धाराशिव
येथील शिवाजी चौकात पारधी समाजातील दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये गावठी पिस्तूलचा गोळीबार झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरातील वातावरण काही काळ तणावाचे वातावरण होते. तुफान दगडफेकीमुळे भितीपोटी व्यापार्यांनी आपली दुकाने बंद केली होती.
येथील पारधी पिढीवर या पारधी समाजाचे कारण (कांयर) होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केल्याने तरुणांची बाचाबाची सुरू झाली. सायंकाळच्या वेळी शिवाजी चौकामध्ये दोन गटांमध्ये तुफान दगडफेक सुरू झाली. यातील एका गटाने गावठी पिस्तूलीच्या पाच गोळ्या झाडल्या. या गोळ्या याच समाजातील दोन तरुणांना लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये विकास बापु पवार व राहुल बापु पवार यांना गोळी लागल्याची घटनास्थळी चर्चा होती.
भांडणात दगड, तलवारी, कोयते, काठ्या, साखळ्या याचा वापर उघडपणे चालू होता. या भांडणाची सुरुवात मार्केट कमिटीच्या आवारातून सुरू झाली. यामध्ये पारधी समाजाच्या महिलांची आक्रमक भूमिका होती. शहरातील या समाजाकडे गावठी पिस्तुले, तलवारी कुठून आल्या याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी म्हटले. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी जमावावर नियंत्रण ठेवले. परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्याची परिस्थिती दिसताच उपविभागीय पोलिस अधिकारी कटेकर यांनी तालुक्यातील पोलीस ठाण्यांना संपर्क साधून ज्यादा कुमक मागवून शहरात तैनात केले.
शहरात भीतीचे वातावरण
गेल्या अनेक दिवसापासून हे प्रकार थांबले होते परंतु दोन समाजातील भांडणामुळे गावडी पिस्तूलच्या पाच फैरी झाडण्यात आल्या. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
























































