तिहेरी तलाकच्या विरोधात हिंदुस्थानातील पहिली केस मुंब्र्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

ट्रिपल तलाकविरोधात अवघ्या दोन दिवसांपूर्वी संसदेत कायदा मंजूर झाला असतानाच या तलाकविरोधात देशातील पहिला गुन्हा मुंब्य्रात दाखल झाला आहे. व्हॉट्स ऍपवरून ट्रिपल तलाक देणार्‍या मुंब्र्यातील ‘मियाँ’ला त्याच्या उच्चशिक्षित ‘बिबी’ने दणका दिला. तिने पोलिसांत तक्रार दाखल करताच मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्यांतर्गत तिचा पती इम्तियाज पटेल याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर इम्तियाज पटेल हा फरार झाला असून त्याचा कसून शोध सुरू आहे.

इम्तियाज गुलाम पटेल (35) याचा विवाह एका उच्चशिक्षित तरुणीशी झाला होता. ती गर्भवती असतानाच माझे दुसर्‍या मुलीवर प्रेम आहे, मला दुसरे लग्न करायचे आहे असे सांगून इम्तियाज तिचा वारंवार मानसिक छळ करीत होता.

इम्तियाज हा त्याच्या प्रेयसीकडे राहू लागला. वर्षभरापूर्वी अचानक इम्तियाजने व्हॉट्स ऍपवरून तिला ट्रिपल तलाक दिला आणि त्याने त्याच्या प्रेयसीशी लग्नही केले. याविरोधात त्या तरुणीने मुंब्रा पोलीस ठाण्यात जाऊन तलाकसाठी जबरदस्ती आणि हुंडय़ासाठी छळ होत असल्याची तक्रार दिली होती. केंद्राने ट्रिपल तलाक कायदा मंजूर करताच मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आज इम्तियाज गुलाम पटेल याच्यावर ट्रिपल तलाकविरोधात तर त्याच्यासह त्याच्या आई व बहिणीवर हुंडय़ासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल

मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा कलम 4

498 अ – हुंडय़ासाठी छळ

406 – स्त्रीधन हडपणे

34 – गुन्हा करण्यास मदत करणे

या कायद्यातील शिक्षा

अजामीनपात्र गुन्हा

तीन वर्षे कारावासाची शिक्षा