
सामना प्रतिनिधी, मुंबई
महापालिकेच्या वतीने लवकरच भांडुपमध्ये मुंबईतील पहिले जपानी पद्धतीचे उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानात दगड, वाळू, विविध प्राण्यांचे आकार दिलेली झाडे आणि जपानी पद्धतीचे लॅण्डस्केपिंग केले जाणार आहे. याकरिता पालिका ५ कोटी २४ लाख रुपये खर्च करणार असून याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
पालिकेच्या ‘एस’ विभागातील भांडुप येथील सी. टी. एस. क्रमांक १९८ या उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर जपानी पद्धतीने उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे. पालिकेच्या उद्यान कक्ष विभागाने आतापर्यंत मुंबईत विविध ठिकाणी विविध थीम गार्डन तयार केले आहेत. त्याअंतर्गत भांडुपमध्ये आता जपानी गार्डन साकारण्यात येणार आहे. यामध्ये संरक्षक भिंत बांधणे, अंतर्गत पदपथ, गझेबो बांधणी, भूमिगत पाण्याची टाकी, सुरक्षारक्षक चौकी, प्रवेशद्वाराची कामे, उद्यानासाठी मातीची भरणी करणे, वरिष्ठ नागरिकांसाठी बसण्याची जागा, विद्युत खांब, दिवे, बेंचेस मुलांकरिता खेळणी, सीसीटीव्ही कॅमेरा, पदपथाच्या बाजूला फुलझाडे लावणे, हिरवळीचे उंचवटे इ. कामांचा समावेश आहे. या कामाचा कालावधी पावसाळ्यासह ११ महिने असून याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर निर्णय होणार आहे.
चालण्यासाठी वाळूचा ट्रक
वाळूवरून अनवाणी चालण्याचे अनेक फायदे असतात. त्यामुळे या उद्यानात खास अनवाणी चालण्यासाठी विशिष्ट प्रकारचा ट्रक तयार करण्यात येणार आहे. पायाला अॅक्युप्रेशर मिळू शकेल असे वाळूचा, गवताचा आणि नैसर्गिक स्टोनचा वापर करून हे ट्रक तयार केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.


























































