ताऱ्यांविना होणार झगमगाट; वर्ल्ड कपच्या रंगीत तालमीत राखीव खेळाडूंचा कस लागणार

हिंदुस्थानी खेळाडूंना वर्ल्ड कपची तयारी करता यावी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली. पहिला सामना मोहालीत शुक्रवारी खेळविला जाणार असला तरी ताऱयांविना होणाऱया या सामन्यात वर्ल्ड कप संघाबाहेर असलेल्या खेळाडूंचा कस लागणार आहे. या सामन्यामधील चांगली कामगिरी त्यांच्यासाठी वर्ल्ड कपचे दरवाजेही उघडू शकते. ऑस्ट्रेलियन संघातही ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क नसल्यामुळे त्यांचा संघही पूर्ण ताकदीनिशी उतरू शकणार नाही. तरीही ताऱयांविना होणाऱया या सामन्यात थराराचा नक्कीच झगमगाट पाहायला मिळेल.

वर्ल्ड कपच्या दहा दिवस आधी होणाऱया या मालिकेत हिंदुस्थानी खेळाडूंना ऑस्ट्रेलियासारख्या तगडय़ा संघाविरुद्ध खेळता मिळणार आहे. यासाठी हिंदुस्थानने आपल्या वर्ल्ड कपच्या संघातील एक-दोन नव्हे तर चक्क रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंडय़ा, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल या पाच जणांना विश्रांती देत संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना संधी दिली आहे. खेळाडूंना वर्ल्ड कपची रंगीत तालीम करता यावी म्हणून या मालिकेचे आयोजन करण्यात आले असतानाही राखीव खेळाडूंना संधी देऊन वर्ल्ड कपचे दरवाजे अद्याप खुले असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.

हिंदुस्थानच्या फलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे आव्हान

हिंदुस्थानच्या फलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंडय़ाच्या अनुपस्थितीमुळे हिंदुस्थानची फलंदाजी किती मजबूत आहे ते उद्या मोहालीवरच कळेल. ऑस्ट्रेलियन ताफ्यात स्टार्क नसला तरी त्यांचे आघाडीचे चार गोलंदाज हिंदुस्थानी फलंदाजांसमोर आपले वेगवान कौशल्य दाखवतील, यात तीळमात्र शंका नाही.

राहुल, गिलला संधी

कोहली, शर्माच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानी फलंदाजीची मदार कर्णधार के. एल. राहुल आणि शुबमन गिलवर असेल. आशिया चषकात या दोघांनीही दमदार खेळ केला होता. पण श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार या मुंबईकरांना आपले महत्त्व पटवून देण्याची आणखी संधी मिळाली आहे. अय्यर अनफिट असल्यामुळे त्याला सामने खेळताच आले नाहीत, तर सूर्याला अद्याप टी-20 चा सूर सापडलेला नाही. या दोघांकडूनही जोरदार खेळाची अपेक्षा आहे. आपली फलंदाजी नव्या दमाच्या खेळाडूंवर असली तरी गोलंदाजीत बुमरा, सिराज आणि शमी हे त्रिकूट असल्यामुळे आपली ताकद निश्चितच वाढलेली आहे. मुख्य फलंदाजाशिवाय हिंदुस्थानी संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

हिंदुस्थानचा संघ

के. एल. राहुल (कर्णधार), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.

ऑस्ट्रेलियन संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, ऍलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, मॅट शॉर्ट, स्टीव स्मथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.