वरळीत उभे राहणार हिंदुस्थानातील पहिले अंधांसाठीचे उद्यान, युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधांनाही सर्वसामान्यांप्रमाणे कला, छंद जोपासता यावेत आणि निवांत वेळ घालवता यावा यासाठी वरळीत देशातील पहिले अंधांसाठीचे उद्यान मुंबई महापालिका तयार करणार आहे. यासाठी युवासेनेने मुंबई महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून आता लवकरच वरळीत अंधांसाठी उद्यान विकसित केले जाणार आहे.

मुंबईत ठिकठिकाणी महापालिकेने विविध वयोगट, मुले तसे प्राण्यांसाठी उद्याने विकसित केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंधांनाही सर्वसामान्यांप्रमाणे निवांत वेळ घालवता यावा यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानातील पहिले उद्यान विकसित करावे, अशी मागणी युवासेनेने महापालिकेकडे केली. वरळीतील अंधांसाठी नॅशनल असोसिएशन्स फोर ब्लाइंड्स (नॅब) आणि हैप्पी होम ब्लाइंड स्कूल या दोन मोठय़ा संस्था मुलांना कलेबरोबर शिक्षणही देत आहेत. अनेक खडतर परिस्थितीशी झगडत आपले ध्येय गाठणाऱ्या या मुलांसाठी विशेष उद्यान विकसित करावे, अशी मागणी युवासेनेच्या वतीने जी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना निवेदन देऊन केली. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, युवा विभाग अधिकारी संकेत सावंत, युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील, टीम व्हिजन फाऊंडेशनचे संदेश भिंगार्डे तसेच अंध संस्थेचे सदस्य उपस्थित होते. शरद उघडे यांनी ही मागणी मान्य करत लवकरच उद्यान वरळीत उभे करणार असे आश्वासन दिले.