पर्यटन हंगामात मासळी भिडली गगनाला, आवक घटल्याने दर भडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासळीची आवक घटल्याने ऐन पर्यटन हंगामात मिळणाऱ्या अल्प मासळीचे चढे दर गगनाला भिडल्याची स्थिती आहे. पर्यटकांची मोठी मागणी असताना सुरमई, पापलेट तसेच बांगडा आदी मासळी काही वेळा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

परराज्यातील एलईडी लाईट (बंदी असलेल्या) मासेमारी बोटींद्वारे होणारी बेसुमार मासळीची लूट, अन्य अनधिकृत मासेमारी प्रकारामुळे कोकण किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. तर गेले काही दिवस वाऱ्यांचा व लाटांचा जोर वाढल्याने मच्छिमारांच्या बोटीही परतल्या आहेत. त्यामुळे त्याचाही फटका मत्स्य व्यवसायाला सहन करावा लागला. पारंपारिक मच्छीमारांच्या मोठ्या बोटी तसेच स्थानिक मच्छिमारांच्या जाळीत किरकोळ मासळीच मिळत आहे. काही वेळा खर्च जास्त आणि जाळीत मासळीच नाही अशीही स्थिती असल्याने मच्छिमार हवालदिल झाला आहे.

कोकण किनारपट्टी भागात रात्रीच्या वेळेस होणाऱ्या अनधिकृत पर्ससीन, एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे गेले तीन चार महिने स्थानिक मच्छीमारांना मासळी मिळणेच कठीण बनले आहे. मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणात इंधनावर खर्च होत असताना मासळीचे म्हणावे तसे उत्पन्नच मिळत नसल्याने अनेक मच्छीमारांनी नौका समुद्रातच उभ्या केल्याचे चित्र दिसून येत आहे.

कमीत कमी पाचशे-हजार रुपये हवेतच
मालवणात मुंबईकर चाकरमानी, पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. मात्र मासळीच्या दरात वाढ झाल्याने हॉटेलमधील मत्स्याहारी थाळ्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मत्स्य खवय्यांकडून सुरमई, पापलेट, बांगडा आदी मासळीला पसंती असल्याने त्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. बाजारातून घरी मासळी आणण्यासाठी तर कमीत कमी पाचशे ते हजार रुपये चांगल्या मासळीसाठी मोजावे लागत आहेत.

दर दुप्पट वाढले
घाऊक बाजारात पाचशे ते सातशे रुपये दराने मिळणारी सुरमई मासळी सद्य स्थितीत एक हजार ते बाराशे रूपये दराने मिळत आहे. पापलेटही आठशे रुपये दरावरून एक हजार रुपयापर्यंत पोहचली आहेत. बांगडा व अन्य मासळीचे दरही दुप्पटीने वाढले आहेत.

एलईडीचा हैदोस व समुद्रातील अंतर्गत बदल
समुद्रात सुरू असलेला एलईडी लाईट मासेमारी बोटींचा हैदोस, त्या बरोबर समुद्रातील अंतर्गत बदल ही मासेमारी घटण्याची प्रमुख कारणे आहेत, असे मत्स्य उदोजक हरी खोबरेकर यांनी सांगितले. तर यावर्षी बंपर नाहीच पण थोड्या प्रमाणातही तारली मासळी मिळाली नाही. मोठी मासळी तर मिळतच नाही. किनाऱ्यावर रापण, गिलनेट, बोट अश्या सर्वच प्रकारच्या मासेमारी जाळीत मासळीच मिळत नसल्याने मिळणाऱ्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. पर्यटकांची मागणी लक्षात घेता काही व्यावसायिक व हॉटेल धारक यांना गोवा, रत्नागिरी येथून मासळी आयात करावी लागत आहे असेही खोबरेकर यांनी सांगितले.