घशात मासा अडकून सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

घशात मासा अडकून अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. शहबाज अन्सारी असे या चिमुकल्याचे नाव असून आपल्या बाळाचा डोळ्यांदेखत तडफडून मृत्यू झाल्याने अन्सारी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अंबरनाथ पश्चिमेच्या उलन चाळ परिसरात सरफराज अन्सारी हे त्यांच्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांना शहबाज हा ६ महिन्यांचा मुलगा होता. गुरुवारी रात्री घराबाहेर इतर लहान मुलं शहबाजच्या बाजूने खेळत असताना हा प्रकार घडला. चिमुकला शहबाज अचानक तडफडू लागल्याने इतर मुले घाबरली. त्यांनी चिमुकल्याचा आईवडिलांना याबाबत माहिती दिली. शहाबाजची तडफड पाहून त्याचे आईवडीलही धास्तावले. नेमके काय झाले, हे त्यांनाही कळत नव्हते. शहबाजला खासगी डॅाक्टरांकडे नेले असता तेथेही निदान होऊ शकले नाही. त्यामुळे त्याला घेऊन पालकांनी उल्हासनगरचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय गाठले. पण तोपर्यत फार उशीर झाला होता. तिथे पोहोचण्यापूर्वीच शहबाज याचा दुदैवी मृत्यू झाला. डॅाक्टरांनी शहबाज याला तपासले असता त्याच्या घशात मासा अडकल्याने आणि श्वास रोखल्यानेच मृत्यू झाल्याचे सांगितले.

मासा नेमका आला कुठून?

शहबाजच्या बाजूला शेजारची मुलं खेळत होती. त्यावेळी कोणीतरी घरातून मासा आणला. हाच मासा त्याने गिळला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे आपल्या लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.