
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईतल्या कोळीवाडय़ांमधल्या मोकळय़ा जागा आरक्षित करण्याच्या घोषणेनंतर कोळीबांधवांना सरकारने आणखी एक खूशखबर दिली आहे. कोळीवाडय़ांचे सीमांकन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथील जागा कोळीबांधवांच्या नावावर करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सरकारने आज विधान परिषदेत केली. याशिवाय कफ परेड मच्छीमार नगर कोळीवाडय़ाच्या सीमांकनाचा प्रश्नही येत्या 5 ते 10 डिसेंबरदरम्यान बैठक घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासनही सभागृहाला दिले.
कफ परेड मच्छीमार नगर कोळीवाडय़ाचेही सीमांकन करावे अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली होती. शासनाच्या धोरणामुळे कफ परेड मच्छीमार नगर कोळीवाडय़ाचे सीमांकन रखडले आहे. त्यामुळे येथील कोळीबांधवांमध्ये संताप आहे. त्यामुळे येथील सीमांकनाचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. राहुल नार्वेकर यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारकडे केली होती. त्याला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. दरम्यान, काँग्रेसच्या भाई जगताप यांनीही येथील कोळीबांधव इतरत्र कुठे जाऊ नयेत यासाठी लवकरात लवकर सीमांकन करावे अशी मागणी केली.
कफ परेड मच्छीमार नगर हा कोळीवाडा नाही
मूळचा कोळी बांधव हा मुंबईचा मुख्य रहिवाशी आहे, पण कफ परेड मच्छीमार नगर हा कोळीवाडा नाही. कारण या ठिकाणी रेक्लमेशननंतर कफ परेड हा भाग अस्तित्वात आला. यावर अॅड. राहुल नार्वेकर यांनी आमच्या चार पिढय़ा कुलाब्यात राहात आहेत. येथे राहाणारा कोळी बांधव खूप आधीपासून येथे राहत आहे. तो मूळचा मुंबईकरच आहे. तसेच येथे कोळीवाडा अस्तित्वात आहे असे सांगितले. तरीही चंद्रकांत पाटील आपल्या वक्तव्यावर ठाम होते. तसेच तरीही नार्वेकर यांच्या सूचनेची दखल घेऊन कफ परेड कोळीवाडय़ाचे सीमांकन करण्यात येईल असे पाटील म्हणाले.
शिवस्मारकाप्रकरणी कोळीबांधवांशी पुन्हा चर्चा
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाला कोळीबांधवांचा विरोध नाही, परंतु या स्मारकाच्या जागेबाबत येथील कोळीबांधवांच्या काही सूचना आहेत म्हणूनच कफ परेडमधील तसेच इतर कोळीबांधवांची बैठक घेण्यात येईल. यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जातील अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.






























































