मालाडमध्ये फ्लेमिंगोंची शिकार करणाऱ्या पाचजणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

परदेशातून पाहुणे म्हणून आलेल्या आणि मालाडच्या कांदळवनात आश्रय घेतलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांची बंदुकीने शिकार करणाऱ्या ५ जणांना वनखात्याच्या मॅग्रोव्हज सेलने अटक केली आहे. त्यांच्याजवळील बंदूक त्यांनी सर्व्हिसिंगला दिल्याने ती जप्त करण्यात आलेली नाही.

गेल्या १० जुलै रोजी हे ५ जण मालाड पश्चिमेच्या मालवणी गावातील ९० फूट रोडवर खाडीकिनारी मरीना कंपाऊंड येथील सोनाटा इमारतीजवळून बंदूक घेऊन कांदळवनाच्या दिशेने जाताना स्थानिकांनी पाहिले. कांदळवनात परदेशी फ्लेमिंगो पक्ष्यांची शिकार करून ते मृत फ्लेमिंगोंना प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून घेऊन जात होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांची छायाचित्रे काढून ‘पॉझ’ या पशूप्रेमी संघटनेला पाठवली होती. त्यावरून या संघटनेने पोलीस आणि वनखात्याकडे तक्रार केली होती, अशी माहिती मुंबईचे वाइल्डलाइफ गार्डन सुनीश सुब्रमण्यम यांनी दिली. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये फ्लेमिंगो या पक्ष्यांचा समावेश शेडय़ूल ५ मध्ये होतो. त्यांच्या शिकारीला कायद्याने बंदी आहे.