
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिंदुस्थान आणि बांगलादेशच्या क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करणार्या पाच जणांना आंबोली, दिंडोशी आणि मालाड पोलिसांनी अटक केली. मुंबई पोलिसांची ही पाचवी कारवाई आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान सट्टेबाजी करणार्या बुकींविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मंगळवारी हिंदुस्थान विरुद्ध बांगलादेश सामन्यावर ऍप्सवरून सट्टेबाजी केली जात असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली. त्यानुसार दिंडोशी पोलिसांनी कारवाई करून दोन जणांना अटक केली. त्या दोघांविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली, तर मालाड पोलिसांनी कारवाई करून एकाला अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. तर तिसरी कारवाई आंबोली पोलिसांनी केली. अंधेरीच्या जे. पी. रोड परिसरात पोलिसांनी छापा टाकून चंद्रकिशोर खन्ना ऊर्फ मामाजी आणि रुचित अरोराला अटक केली. मामाजी हा मोठा बुकी आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी चार मोबाईल, डायरी, आठ एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. मोबाईलवर सट्टा घेताना दोघांना रंगेहाथ पकडल्याचे वरिष्ठ निरीक्षक भारत गायकवाड यांनी सांगितले. दोघांची जामिनावर सुटका करण्यात आली.
ऍप्सवरून सट्टेबाजी
पूर्वी सट्टेबाज हे फोनवरून सट्टा घेत असायचे, पण आता ऍप्सवरून सट्टा घेतला जात आहे. परदेशातील बुकी हे ऍप्स छोटय़ा बुकींना तयार करून विकतात. छोटे बुकी हे त्या ऍप्सवर सट्टा खेळणार्याला लॉगीन देतात. सट्टा खेळणार्याला 10 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत क्रेडिट देतात. त्याचा सर्व तपशील हा बुकींच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंद होत असतो. सट्टेबाजीतील पैशाचा व्यवहार हा हवालामार्फत होत असतो.
जुगारात सहभाग आढळून आल्याने अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला आंबोली पोलिसांनी अटक केली. हिमालय दासानी असे त्याचे नाव आहे. त्याची जामिनावर सुटका केली. अभिनेत्री भाग्यश्री ही ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून घराघरात पोहचली होती. भाग्यश्रीने हिमालयसोबत विवाह केला होता. गेल्या महिन्यात आंबोली पोलिसांनी जुगाराची केस केली होती. त्यात पोलिसांनी 15 जणांना अटक केली होती. त्याचा तपास आंबोली पोलीस करत होते. तपासादरम्यान हिमालयचा सहभाग स्पष्ट झाला. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्याचे आंबोली पोलिसांचे म्हणणे आहे. हिमालयला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.



























































