लुटमारीच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कात्रज येथील नवीन बोगद्याच्या अलीकडे ट्रकचालकांची लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयते, मोबाईल असा 37 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली.

आकाश भरत थोरात (वय 24), सचिन आप्पा रणदिवे (वय 30), ओंकार भाऊसाहेब रणदिवे (वय 22, तिघेही रा. आंबेगाव खुर्द), तुषार आनंदा दुधाणे ( वय 20, रा. कात्रज) , तनिष्क संतोष सोनवणे (वय 18, रा. कात्रज ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कात्रज नवीन बोगद्याच्या अलीकडे पाचजण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती कर्मचारी शंकर कुंभार आणि जगदीश खेडकर यांना मिळाली. संबंधित टोळीकडे शस्त्रास्त्रे असून ते ट्रकचालकांना लुटण्याच्या तयारीत असल्याचेही पोलिसांना समजले.

पोलिसांनी दोन पथके तयार करुन पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयते, मोबाईल जप्त करण्यात आले. अधिक चौकशीत टोळी सराईतांची असून त्यांच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, श्रीधर पाटील, गणेश सुतार, राजू वेगरे, शंकर कुंभार, निलेश खोमणे, प्रणव संकपाळ, समीर बागसिराज, हर्षल शिंदे, प्रदीप शिंदे, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने केली.