
आषाढी एकादिशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱयातून लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱया वारकऱयांना खूशखबर आहे. वारकऱयांची पंढरपूरला जाताना आणि वारीनंतर परतत असताना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने तब्बल पाच हजार बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वारकऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पायी दिंडीसोबतच शेकडो दिंडय़ांच्या माध्यमातून लाखो भाविक पायी पंढरपूरला येतात. तसेच अनेकजण एसटीनेही पंढरपूर गाठतात. त्यामुळे पंढरपूरला जाताना आणि वारीनंतर परतीच्या प्रवासादरम्यान त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने तब्बल पाच हजार गाडय़ा सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच गरज पडल्यास आणखी जादा गाडय़ा सोडल्या जातील आहेत. दरम्यान, सध्या एसटीमध्ये 70 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सोय आहे, तर महिलांनाही 50 टक्के सवलत आहे. त्यामुळे यंदा एसटीने पंढरपूरला जाणाऱयांची संख्या मोठी असणार आहे. त्याची दखल घेत महामंडळाने चोख व्यवस्था केली आहे.
गाडय़ांच्या दुरुस्तीसाठी ठिकठिकाणी पथके तैनात
एसटी महामंडळाकडून आषाढी वारीनिमित्त पाच हजारहून अधिक गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. या गाडय़ा राज्याच्या कानाकोपऱयातून येणार असल्याने त्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची दखल घेत महांडळाने पंढरपूरच्या दिशेने येणाऱया सोलापूर जिह्यातील सर्व मार्गांवर दुरुस्ती पथके तैनात केली आहे. एखाद्या गाडीत बिघाड झाल्यास ती तत्काळ दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच मोठा बिघाड असल्यास संबंधित प्रवाशांना तत्काळ पर्यायी गाडी उपलब्ध करून दिली जाणार आहे.



























































