
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईकरांची शनिवारी नाकाबंदी केल्यानंतर आज वरुणराजाने चांगलाच रुद्रावतार धारण केला. रात्रीपासून सुरू असलेल्या धुवांधार पावासामुळे कुर्ला, शीव, चुनाभट्टी, भांडुपच्या सखल भागांत पाणी भरले. रस्ते पाण्याखाली गेल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. रेल्वे रुळांवर दोन-अडीच फूट पाणी भरल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक पुरती कोलमडली होती. धारावी येथे एक तरुण खाडीत वाहून गेला तर सांताक्रुझ येथे विजेचा धक्का लागून आईसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गेल्या 24 तासांत विक्रोळीत सर्वाधिक 300 मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे.
वरुणराजाने रात्रीपासून मुंबापुरीला झोडपून काढल्याने सखल भागांत पाणी भरल्याने सकाळपासूनच ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. मिठी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने बैलबाजार क्रांतिनगरातील रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
24 तासांत सर्वाधिक पावसाची नोंद
मलबार हिल 144 मिमी, भायखळा 136 मिमी, महापालिका मुख्यालय, 134 मिमी, वरळी 133 मिमी, विक्रोळी (प.) 300 मिमी, गव्हाणपाडा 268 मिमी, मुलुंड 274 मिमी, कुर्ला 188 मिमी, भांडुप सर्कल 177, मिमी, चेंबूर 156 मिमी, कांदिवली 276 मिमी, वांद्रे 254 मिमी, दिंडोशी 249 मिमी, मालाड 235 मिमी, चिंचोली 222 मिमी, वांद्रे (प) 220 मिमी, प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह 218 मिमी, जेगेश्वरी 225 मिमी, गोरेगाव 204 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
क्रांतिनगर वसाहतीला मिठी नदीचा फटका
कुर्ला परिसरातील बैल बाजारजवळील क्रांतिनगर परिसराला मिठी नदीच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. मिठी नदीच्या पाण्याची पातळी थोडी जरी वाढली तरी येथे पाणी शिरते. शनिवारच्या पावसामुळे या वस्तीत पाणी भरलेले असतानाच आजही पाण्याची पातळी वाढल्याने रहिवाशांना जवळच्या शाळेत तात्पुरते हलवण्यात आले. नदीचे घाण पाणी सतत वस्तीत येत असल्याने रोगराईदेखील बळावण्याची भीती निर्माण झाली आहे. क्रांतिनगर ही 1600 कुटुंबाची वस्ती विमानतळाच्या दोन धावपट्टय़ांच्या मध्यभागी आहे. विमानतळाकडून सोडले जाणारे पावसाचे पाणीदेखील या वस्तीत येत असल्याने येथील रहिवासी त्रस्त आहेत.
138 पडझडीच्या घटना
शहर 1, पूर्व उपनगरात 5 व पश्चिम उपनगरात 5 अशा 11 ठिकाणी घरे व घराच्या भिंती कोसळल्या. 45 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर शहरात 24, पूर्व उपनगरात 42 आणि पश्चिम उपनगरात 72 अशा एकूण 138 ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पडल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
धरणांचे दरवाजे उघडले
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने सर्वच्या सर्व 38 दरवाजे उघडले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया भातसा धरणातीलही विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
विमानसेवा उशिराने
पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने मुंबई विमानतळावरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान सेवांवरही परिणाम झाला. विमानांची उड्डाणे अर्धा तास उशिराने झाली. हीच परिस्थिती विमानतळावर उतरणाऱया विमानांचीही होती.
धारावीतील खाडीत तरुण वाहून गेला
मुसळधार पावसामुळे धारावीतील राजीव गांधी नगर, बस डेपोजवळ असलेल्या खाडीत रजा महबूब शेख (23) हा तरुण बुडाला असून तो अद्याप बेपत्ता आहे. पोलीस, जीवरक्षकांकडून त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दिंडोशीत दरड कोसळून चार जखमी
मुसळधार पावसामुळे दिंडोशी नुरानी मस्जिदजवळ राजीव गांधी नगराला लागून असलेल्या डोंगराचा काही भाग येथील झोपडय़ांवर कोसळल्याने चार जण जखमी झाले. या चारही जणांवर जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
पुण्यात मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली
पुण्यात मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीकाठच्या तब्बल 500 रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. मुळशी धरणातून पाणी सोडल्याने पौड-मुळशी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण 100 टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला. त्यामुळे भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला.
साताऱ्यात शंकराला दोरखंडाने बांधले
साताऱ्यात संगम माहुलीला पूर आला. पुराच्या पाण्यात येथील 20 ते 25 फुटी शंकराची मूर्ती वाहून जाऊ नये म्हणून ही मूर्ती जाड दोरखंडाने बांधण्यात आली होती. अनेक भागांत मंदिरेही पाण्याखाली गेली असून पुराच्या पाण्याचा फटका देवांनाही बसला. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांच्या सहकार्यासाठी सरकारही सतत प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे भाजपचे कार्यकर्तेही अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांना सहकार्य करण्यासाठी पोहोचले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत आम्ही नागरिकांसोबत आहोत, असे मुंबईचे भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
नाशिक जलमय
त्र्यंबकेश्वरमध्ये अतिवृष्टी झाली असून, 24 तासात तब्बल 315 मिलिमीटर पाऊस पडला. नाशिकमध्ये अवघ्या 6 तासात 92 मिलिमीटर पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. इगतपुरी, पेठमध्येही धुंवाधार पावसाने रस्ते जलमय होवून अनेक गावांचा संपर्क तुटला. गंगापूर धरणातून 45,486 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरीला महापूर आला आहे. येथील श्री नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पाणी पोहचले. निफाड तालुक्यातील सायखेडा, करंजगाव, चांदोरीसह अनेक गावांना पुराने वेढले असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी ‘एनडीआरएफ’चे बचावकार्य सुरू होते. उद्या सोमवारी देखील अतिवृष्टीचा अंदाज असल्याने जिल्हाधिकाऱयांनी जिह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
या लांबपल्ल्याच्या गाडय़ा केल्या रद्द
मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे, नाशिक-मुंबई रेल्वेगाडय़ांची वाहतूक ठप्प झाली. नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस इगतपुरीत खोळंबली. याशिवाय मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस, मुंबई-शिर्डी साईनगर एक्स्प्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस, मुंबई-चेन्नई मेल, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, भुसावळ-पुणे एक्स्प्रेस या लांबपल्ल्याच्या गाडय़ा रद्द करण्यात आल्या.
विजेचा शॉक लागून मायलेकाचा मृत्यू
मुंबई – विजेचा शॉक लागल्याने मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सांताक्रुझच्या गोळीबार नगर येथे घडली. माला भूपना मालम आणि संकेत मालम अशी या दोघांची नावे आहेत. निर्मल नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
माला या गोळीबार नगर येथील पटेल नगर येथे राहत होत्या. घरासमोरील लोखंडी शिडीला माला यांचा स्पर्श झाला. शॉक लागल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी संकेत गेला असता त्या दोघांनाही शॉक लागला. त्यांना शेजारील रहिवाशांनी उपचाराकरिता सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेले पण तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि निर्मल नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी तेथे गेले. सायंकाळी नागरिकांनी काही वेळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर रस्ता रोको केला होता.
बेस्टच्या 23 बसचा ब्रेकडाऊन
लोकल ट्रेन बंद झाल्याने बेस्ट मुंबईकरांच्या मदतीला नेहमीप्रमाणे धावून आली. रविवारी बेस्टच्या बसेस कमी बाहेर पडतात. पावसाने सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे बेस्टच्या 23 बस बेकडाऊन झाल्या. बंद पडलेल्या 23 बसेसपैकी 17 बसेसना अटेंड करण्यात आले तर पावसाच्या पुरात अडकलेल्या दहा बसेसपैकी आठ बसेसना अटेंड करण्यात आले. उरलेल्या बसेसना पाण्यातून काढण्याचे काम सुरू असल्याचे बेस्टने म्हटले आहे.
एसटीच्या बसेस मदतीला
मध्य रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाडय़ांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाकडून 51 बसेस सोडण्यात आल्या. त्यात शहापूरसाठी 17 बसेस मागविण्यात आल्या असून अनुक्रमे उंबरमाळी 3, खर्डी 4, वाशिंद 2, आटगाव 6, खडवली 2 बसेसचा समावेश होता तर खर्डी 6, कसारा 6 अशा कल्याण आगारातून 12 बसेस पुरविण्यात आल्या. कसारा 6, खडवली 6 अशा भिवंडी आगारातून 12 बसेस अशा 51 बसेस पुरविण्यात आल्या. उंबरमाळी स्टेशनवरून तीन बसेस पुण्यास पाठविण्यात आल्या. उर्वरित 38 बसेस ठाणे, कल्याणकरिता पाठविण्यात आल्या. नाशिक विभागाकडून इगतपुरी-मुंबईकरिता सहा गाडय़ा पाठविल्या. रोहा डेपोने कोकण रेल्वे प्रवाशांसाठी सात बसेस पनवेलसाठी सोडल्या असून या सर्व बसेसचा संपूर्ण परताना रेल्वे प्रशासन करणार आहे.
कोकण रेल्वेच्या अनेक गाडय़ा रद्द
मध्य रेल्वेच्या आपटा आणि जिते सेक्शनमध्ये रविवारी सकाळी दरड कोसळल्याने कोकण रेल्वेच्या 15 हून अधिक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाडय़ांना वळविण्यात आले असून काही गाडय़ांचा प्रवास मध्येच संपविण्यात आला असून काही गाडय़ा अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर, एर्नाकुलम एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी रोड पॅसेंजर, मंगळुरू जंक्शन, कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, मांडवी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, मत्स्यगंगा एक्सप्रेस, दुरांतो एक्स्प्रेस या 4 ऑगस्टच्या गाडय़ा, तसेच 5 ऑगस्टच्या कोचुवेली एक्स्प्रेस, दादर-रत्नागिरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. पाटणा-वास्को एक्सप्रेस व्हाया मनमाड-दौंड-पुणे मार्गे वळविण्यात आली आहे. मंगला एक्सप्रेस व्हाया इगतपुरी मार्गे वळविण्यात आली आहे. एर्नाकुलम दुरांतो व्हाया सुरत-जळगाव वळविण्यात आली आहे.
या गाडय़ांचा प्रवास अर्ध्यावर समाप्त
भावनगर कोचुवेली पश्चिम रेल्वेवर शॉर्ट टर्मिनेट केली आहे. मांडवी रत्नागिरी स्थानकात स्थगित केली आहे. तेजस एक्स्प्रेस नांदगाव स्थानकात स्थगित केली आहे. मडगाव एसी डबलडेकर एक्स्प्रेस सिंधुदुर्ग स्थानकात स्थगित केली आहे. जनशताब्दी आणि मत्स्यगंधा कुडाळ स्थानकात स्थगित केली आहे. रत्नागिरी-दादर एक्सप्रेस रोहा येथे स्थगित केली आहे. दिवा पॅसेंजर रत्नागिरीत स्थगित केली आहे. कोचुवेली एक्सप्रेस कन्नुर ते एलटीटी अशंत रद्द केली आहे. नेत्रावती एक्स्प्रेस शोरानुर जं. ते एलटीटी दरम्यान अंशतः रद्द केली आहे.



























































