पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला विठुराया, मंदिर समितीकडून अन्नछत्र सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pandharpur-flood

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

उजनी धरणातून दीड लाख आणि वीर धरणातून एक लाखाचा विसर्ग सोडल्यावर भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपूरच्या चंद्रभागा वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून नदीकाठी राहणाऱ्या शंभराहून अधिक कुटुबांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. पुराच्या पाण्याने संसार बुडालेल्या आपतग्रस्त कुटुंबासाठी मंदिर समितीने अन्नछत्र सुरू केल्याने पूरग्रस्तांमध्ये साक्षात बा विठ्ठल धावून आल्याची भावना निर्माण झाली आहे.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाद यांनी आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्याचा तातडीने निर्णय घेतला आहे. शहरातील रामबाग आणि 65 एकर मध्ये पूरग्रस्त कुटूंब स्थलांतरित करण्यात आले असून याठिकाणी जेवण व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही पुरग्रस्तांची उपासमार होणार नाही याची दक्षता मंदिर समितीने घेतली आहे.