पंढरपुरातील महापूर ओसरला; युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू

पंढरपूरात पूरामुळे दोन दिवसांपासून गावात आणि शेतात शिरलेले पाणी आता ओसरत आहे. पूराचे पाणी ओसरल्यानंतर रस्ते, घरे, दुकाने आणि शेताच्या स्वच्छतेची मोहीम जोमाने हाती घेण्यात आली आहे. पंढरपूरच्या चंद्रभागेतून 2 लाख 91 हजार क्यूसेक्स पाणी वहात होते. त्यामुळे नदीकाठच्या भागातील शेती, घरे आणि बाजारपेठ पाण्याखाली गेली होती.

या पुराच्या पाण्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. घरामध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्य वस्तूंचेही नुकसान झाले आहे. अनेक दुकानातील माल या पाण्याने भिजून गेला. नगरपरिषदेने शनिवारी पहाटे पाणी नदी पात्राचे घाट आणि रस्त्यांवरील चिखल, राडारोडा स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आणि त्यांची पथक सखल भागात युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम करत आहे. दरम्यान पुराचे पाणी ओसरले असले तरी नदी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या पुलाची स्वच्छता व पुलाची चाचणी केल्यानंतर वाहतूक सुरु केली जाईल, असे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या