
सामना प्रतिनिधी । लातूर
दुष्काळी लातूर जिल्ह्यात शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत उत्पन्न वाढीचा मार्ग शोधत आहेत. औसा तालूक्यातील वडजी येथील तरुण शेतकऱ्याने फुलशेतीचा मार्ग चोखळला आहे. या माध्यमातून चांगले उत्पन्नही मिळवले आहे. लातूर जिल्ह्याची ओळखच दुष्काळी जिल्हा म्हणून आहे. औसा तालूक्यातील वडजी येथील नागनाथ नवनाथ माळी त्यांच्या चारएकर शेतीत सोयाबीन, तूर, उडीद, मुग अशी पारंपारिक पिके ते घेत होते. मागील तीन वर्षांपासून चार एकर शेतीपैकी त्यांनी दीड एकरमध्ये फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शेणखताचाही वापर केला. तीन फुटाच्या सरी करुन शेवंती, गलांडा, निशीगंध या फुलांच्या रोपांची लागवड केली. सुमारे 20 हजार रुपयांचा खर्च आला. तर उत्पन्न सुमारे एक लाख 20 हजार रुपये मिळाले आहे. औसा तूळजापुर रस्त्यावर त्यांनी स्टॉल टाकून फुलांच्या हार विक्रीच्या व्यवसायास सुरुवात केली. दररोज किमान 500 ते 600 रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळते.

































































