भारत गौरवयात्रा गाडीतील प्रवाशांना विषबाधा

चेन्नईवरून पलिताना येथे निघालेल्या भारत गौरवयात्रा रेल्वेगाडीतील प्रवाशांना पुण्याकडे येताना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडला. यामुळे गाडीतील 40 प्रवाशांची परिस्थिती गंभीर झाली होती. पुणे स्थानकावर रात्री 11.40 वाजता गाडी आल्यावर स्थानकावरील वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर 12 वाजून 30 मिनिटांनी गाडी पुढे रवाना करण्यात आली. रेल्वे बोर्डाकडून ‘भारत गौरवयात्रा’ हा उपक्रम सुरू आहे. गाडी क्र. 06911 ‘चेन्नई-पलिताना भारत गौरवयात्रा’ ही गाडी चेन्नई येथील चंद्रप्रभू मंदिर या खासगी संस्थेकडून धार्मिक सहलीसाठी बुक केली होती. गाडीत 1080 प्रवासी प्रवास करीत होते. यांतील काही प्रवाशांना पोटदुखी, उलटय़ा आणि जुलाब होत असल्याची तक्रार मंगळवारी रात्री 10.30 वाजता पुणे नियंत्रण कार्यालयाला प्राप्त झाली. रात्री 11.40 वाजता गाडी पुणे स्थानकावर पोहोचली. तेव्हा डॉक्टर आणि वैद्यकीय सहाय्यकांच्या तीन पथकांनी सुमारे 100 प्रवाशांना वैद्यकीय उपचार दिले.