मत्स्यप्रेमी

204

>> शेफ विष्णु मनोहर

प्रणित कुलकर्णी. देऊळबंद या चित्रपटाचा दिग्दर्शक. पट्टीचा खवय्या. साबुदाणा खिचडी ते तळलेले मासे हा खाद्य प्रवास मोठा रंजक.

स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित ‘देऊळबंद’ हा चित्रपट पाहिला. त्याक्षणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱया प्रणीत कुलकर्णीला भेटावे, असे मला बऱयाच दिवसांपासून वाटत होते. ‘लंच डेट विथ सेलिब्रेटी’च्या निमित्ताने त्याच्याशी बोलण्याचा योग जुळून आला.

त्याच्या खाण्याविषयीच्या आवडीनिवडी विचारल्यावर लक्षात आले की, तो मत्स्यप्रेमी आहे. माशांचे सगळेच प्रकार त्याला खूप आवडतात. शाकाहारी जेवणात मात्र शेपूची भाजी सोडून सर्व काही आवडतं. शिवाय साबुदाणा खिचडी, पोहे, दडपे पोहे, वरणफळं, चिवडा, मिसळ, ब्रेडबटर, अंडा भुर्जी, ऑम्लेट आणि मासे यांच्या तर तो प्रेमातच पडला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तो अस्सल खवय्या आहे. त् खाण्याबरोबच तुला हे पदार्थ बनवायला आवडतात का? यावर त्याचे म्हणणे आहे की, कधी कधी स्वयंपाक करायला मजा येते. मी अंडा भुर्जी, चहा उत्तम बनवतो. त्याशिवाय काही वेळा कांदा भजी, थालीपीठ, कांदे-बटाटे रस्सा, रवा फ्राय फिश, चिकन तंदुरी असे पदार्थ आवडीने बनवितो.

खाण्याविषयीच्या गमतीजमतीविषयी प्रश्न केल्यावर तो म्हणाला, पुण्यात राहात असल्यामुळे खाण्याबाबतीत बरेच गमतीशीर किस्से घडले आहेत. एकदा पुण्यातील प्रसिद्ध बटाटेवडेवाल्याकडे गेला असताना त्याने बटाटेवडय़ाबरोबर चटणी दिलीच नव्हती. चटणी का बरं दिली नाही, हा प्रश्न दुसऱया एका नवीन ग्राहकाने विचारल्यावर तो बटाटेवडे विक्रेता मालक म्हणाला की, चटणी वडय़ाच्या आत घालून मगच तळला गेला आहे. खाण्याविषयीच्या गमतीजमतीविषयी बोलत असतानाच त्यांना विचारलं की, स्वतःचं हॉटेल असावं असं कधी वाटतं का? यावर तो मनापासून म्हणाला, हो, नक्कीच! पूर्वी माझ्या आई-वडिलांनी हॉटेल व्यवयास 15 वर्षे केला असे तो अभिमानाने सांगतो.

घरी असल्यावर प्रणीतला आईच्या हातचा स्वयंपाक फार आवडतो. पूर्वी त्यांचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय असल्याने त्याची आई घरीच सर्व प्रकारचे पदार्थ बनवते. असे असले तरी बायकोच्या हातची कारल्याची भाजीही मी तेवढय़ाच प्रेमाने खातो. घरगुती आणि बाहेर जेवण्याविषयी त्याचं असं म्हणणं आहे की, घरगुती जेवण सात्त्विक असतं. त्यामुळे बाहेरच्या जेवणाबरोबरच त्याची तुलना होऊच शकत नाही. तशी तुलना करणंही कठीण आहे.

जाता-जाता त्याला प्रश्न केला की, खाण्यासाठीचं तुझं आवडतं ठिकाण कोणतं? तर तो म्हणाला, वऱहाडी जेवणासाठी ‘विष्णूजी की रसोई, वैशाली, रूपाली, ऑब्लिक, वेरणेकर फिश, गुरूसावंत मालवण कट्टा, त्याच्याकडे जेवणाविषयी बोलायला भरपूर काही आहे, पण वेळेअभावी आम्हाला आटोपते घ्यावे लागले.

दडपे पोहे
साहित्य – 1 वाटी पातळ पोहे, पाव वाटी ओलं खोबरे, पाव वाटी चिरलेला कांदा, 3-4 हिरवी मिरची , 4 चमचे कोथिंबीर, मीठ, साखर, लिंबू चवीनुसार, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग , पाव चमचा हळद
कृती – पातळ पोहे, ओलं खोबरं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर व लिंबाचा रस एकत्र करून त्यावर मोहरी, हिंग, हळद याची फोडणी घाला व लगेच झाकून ठेवा.

मिसळ पाव
साहित्य – 3 वाटय़ा मोड आलेली मटकी , 4 नग लाल मोठे कांदे , 2 वाटय़ा ओले खोबरे , 1 वाटी सुके खोबरे, 3 इंच आल्याचा तुकडा , 1 गाठ लसूण , अर्धी वाटी कोथिंबीर, 2 चमचे कोल्हापुरी चटणे, 1 चमचा गरम मसाला , 2 नग चिरलेले बटाटे , मीठ, हिंग, हळद, तिखट चवीनुसार, 2 नग ब्रेड , अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा , पाव वाटी कोथिंबीर, 1 नग लिंबू , 2 चमचे फरसाण.

कृती – पातेल्यात तेल तापवून त्यात हिंग, हळद घालावी. मटकी, बटाटे टाकून परतावे. बुडेल इतके पाणी, तिखट, मीठ घालून शिजवावे. यात थोडे पाणी राहिले तरी चालेल. कांदे उभे पातळ चिरून घ्यावेत. यातला वाटीभर कांदा बाजूला ठेवून उरलेला कांदा-खोबरे (दोन्ही), गरम मसाला तेलावर भाजून बारीक वाटवा. आलं, लसूण, कोथिंबीर बारीक वाटावी. वाटताना जास्त पाणी घालू नये. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून हिंग, हळद आणि उभा चिरलेला वाटीभर कांदा कोल्हापुरी चटणी टाकावी. परतल्यावर दोन्ही वाटण घालून पुन्हा चांगले परतावे. त्यात मीठ आणि 4 कप पाणी घालून उकळी आणावी. घेताना एका खोलगट प्लेटमध्ये 2 मोठे चमचे फरसाण घ्यावे. त्यावर मटकी, थोडा कच्चा कांदा, कोथिंबीर घालून मग 1 पळी कट घालावा. कट घेताना ढवळून घ्यावा. लिंबू पिळून ब्रेडबरोबर खावे.

आपली प्रतिक्रिया द्या