जेएनपीएच्या चौथ्या बंदरासाठी २०० हेक्टर खाजण क्षेत्रावर दगडमातीचा भराव; मासेमारीला फटका, चिखल उचलण्याची मच्छीमारांची मागणी

जेएनपीएने ११ हजार २८४ कोटी रुपये खर्च करून चौथ्या बंदराचे विस्तारीकरण केले. हे बंदर देशातील सर्वात मोठ्या लांबीचे ठरले आहे. त्याचे काम करीत असताना २०० हेक्टर खाजण क्षेत्रावर दगडमातीचा भराव टाकण्यात आला. त्यामुळे मासेमारीला मोठा फटका बसला आहे. अनेक मच्छीमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून लवकरात लवकर तेथे साचलेला चिखल आणि गाळ उचलावा, अशी मागणी स्थानिक मच्छीमारांनी जेएनपीए प्रशासकाकडे केली आहे. हा गाळ काढल्यास तेथे पुन्हा मासेमारी सुरू करणे शक्य होणार आहे.

जेएनपीएच्या चौथ्या बंदराच्या विस्तारीकरणासाठी २०० हेक्टर खाजण क्षेत्रामध्ये भराव टाकला. त्यापैकी १५ हेक्टर क्षेत्रावर चिखलाचे डोंगर निर्माण झाले आहेत. याआधीच जेएनपीएच्या विविध प्रकल्पांसाठी केलेल्या माती-दगडाच्या प्रचंड भरावांमुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी खाजण क्षेत्र कमी झाले आहे. त्यामध्ये आता नव्याने १५ हेक्टर खाजण क्षेत्राची भर पडली आहे. त्यामुळे १५ हेक्टर खाजण क्षेत्रावरील चिखलाच्या डोंगरांचे सपाटीकरण करण्याची मागणी पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने जेएनपीए कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील यांनी जेएनपीएच्या अध्यक्षांकडे केली आहे.

पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या १५ हेक्टर खाजण क्षेत्रावर ठिकठिकाणी चिखलाचे मोठमोठे डोंगर तयार झाले आहेत. या डोंगर आणि क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खारफुटीची झाडे फोफावली आहेत.

ही खारफुटीची झाडे काढून टाकून डोंगरांचे सपाटीकरण केल्यास मोठ्या प्रमाणावर दुर्मिळ खारफुटीची झाडे नष्ट होणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भीती आहे.

तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक

खाजण जमीन क्षेत्रावरील चिखलाच्या डोंगरांच्या सपाटीकरणांची पारंपरिक मच्छीमारांनी केलेली मागणी आणि पर्यावरणवाद्यांनी दुर्मिळ खारफुटीची झाडे नष्ट करण्यासाठी दर्शवलेला विरोध या दोन्ही परस्पर विरोधी मागण्यांमुळे जेएनपीए प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी अध्यक्ष गौतम दयाल यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकारी जे. वैद्यनाथन यांनी दिली.