
महाराष्ट्रात प्रथमच महापालिकेच्या वतीने शहरातील 18 ते 44 वयोगटातील मतिमंद व दिव्यांग नागरिकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. आज सोमवारी कबीरनगरातील लहुजी साळवे आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार संजय सिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आला.
समदृष्टी क्षमता विकास अनुसंधान मंडळ हे राष्ट्रीय सेवाभावी संस्था दिव्यागांच्या विकासासाठी काम करते. या संस्थेतर्फे 18 ते 44 वयोगटातील दिव्यांग नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार समदृष्टी सक्षम आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या लहुजी साळवे आरोग्य केंद्र कबीरनगर यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली.
या लसीकरणासाठी विहंग शाळा, नवजीवन शाळा, स्वयंसिद्ध शाळा आदींनी सहभाग नोंदवला. यावेळी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा जाधव, मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. नीता पाडळकर यांची उपस्थिती होती.
पहिल्या दिवशी 90 दिव्यांगाचे लसीकरण
या मोहिमेच्या पहिल्या दिवशी 90 दिव्यांग नागरिकांना लस देण्यात आली. विशेष म्हणजे इतर दिव्यांगांची माहिती जमा करून त्यांचेही लसीकरण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. महाराष्ट्रातील ही पहिलीच लसीकरण मोहीम शहरामध्ये राबवण्यात आली आहे. या मोहिमेचा शहरातील दिव्यांग व मतिमंद विद्यार्थी व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा़, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.



























































