महिलांकडून पुरुषांवरही होतात लैंगिक अत्याचार; सर्वेक्षणातून धक्कादायक बाब उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडसह इतर अनेक देशात महिलांनी परुषांशी जबरदस्तीने संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार मानण्यात येत नाही. त्यामुळे पुरुषांवर लैंगिक अत्याचारात वाढ झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अनेक महिला पुरुषांना जबरदस्तीने संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यांना प्रतिकार केल्यास पुरुषांना मारहाण होत असल्याचे एका अहवालातून उघड झाले आहे. इंग्लंडमधील लैकांस्टर विद्यापीठातील विधी शाखेने केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. या संशोधनासाठी महिलांनी अत्याचार केलेल्या 30 पुरुषांशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली आहे. त्यात प्रियकराला बेड्या घालून त्यांच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवण्याच्या घटनेचाही समावेश आहे.

‘ब्रिटनमध्ये पुरुषांना संबंध ठेवण्यासाठी झालेल्या हिंसाचाराचे अनुभव’ या मथळ्याखाली हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालाच्या लेखिका सिओभन विअर यांनी पुरुषांना संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या घटनाही बलात्काराच्या गुन्ह्यात नोंदल्या जाव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. संशोधनासाठी या पुरुषांशी मे 2018 ते जुलै 2019 याकाळात संपर्क साधण्यात आला. आपली प्रेयसी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होती. तिला प्रतिकार केल्यास ती मारहाण करायची, असे एका पुरुषाने सांगितले. संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर आपली प्रेयसी स्वतःला जखमी करून घेत होती, त्यामुळे तिला डॉक्टरकडे नेले. त्याचा काहीच परिणाम झाला नाही. काही महिन्यानंतर ती आपल्याला मारहाण करायला लागली असे एका पुरुषाने सांगितले. आपण कामावर गेल्यास तेथील एका सहकारी नेहमी सेक्स करण्यासाठी दबाव टाकत होती. कार्यालयात कधीही येऊन ती थेट संबंध ठेवायची मागणी करायची. त्यामुळे आपल्याला कामावर जाणेही कठीण झाले होते. तिला नकार सहन होत नव्हता. एका रात्री तिने आपल्या हातात बेड्या ठोकल्या आणि जबरदस्तीने संबंध ठेवले. त्यानंतर ती आक्रमक झाली आणि आपल्याला मारहाण केली असेही एका पुरुषाने सांगितले. या घटनेनंतर काही महिने ती शांत होती. मात्र, पुन्हा एकदा आपल्याला बेड्या ठोकून तिने अत्याचार केल्याचे त्या पुरुषाने सांगितले. तिने आपल्याला गुंगीचे औषध आणि वायग्रा दिल्याने आपण बचाव करू शकलो नाही, असेही तो म्हणाला.

या घटनेची माहिती सहकाऱ्यांना समजल्यावर आपल्याला समाजात वावरणे कठीण झाल्याची प्रतिक्रिया पिडीत पुरुषाने दिली. तुम्ही प्रतिकार का केला नाही, याबाबच आपण काहीच उत्तर देऊ शकत नव्हतो असेही तो म्हणाला. आपल्याच घरात आपण बंधनात अडकल्याचे त्याने सांगितले. पुरुष हे महिलांपेक्षा मजबूत आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात, त्यांच्यावर अत्याचार होऊ शकत नाही, हा गैरसमज असल्याचे सांगत या मान्यतेचेही सिभोवन विअर यांनी खंडन केले आहे. पुरुषांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत असल्या तरी पुरुष त्याविरोधात पुढे येत नाहीत. काही पुरुष पुढे आले तरी समुपदेशकांकडे अशा प्रकरणांवर उपाय नसल्याने पिडीत पुरुषांची निराशा होते असे विअर यांनी स्पष्ट केले. आपल्यावर झालेल्या अत्याचाराची बलात्कार अशी नोंद करावी असे मत अनेक पुरुषांनी व्यक्त केले. मात्र, कायद्यात तशी तरतूद नसल्याने त्यांनी हतबलता व्यक्त केली. पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने अमेरिकेतील काही राज्यात कायदे बनवण्यात आले आहेत. त्यानुसार महिलांवरही बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद होऊ शकते. आता अशा कायद्यांची गरज असल्याचे विअर यांनी सांगितले.