प्रवासात संतुलन बिघडल्याने पर्यटनासाठी आलेल्या युगांडातील महिलेने बसमध्ये गोंधळ घातल्याची घटना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिह्यात घडली. गाडीतून उतरून पळत सुटल्यावर महामार्गावरील एका वाहनाला धडकून ती जखमी झाली. न्यायालयाच्या आदेशाने तिला येरवडा (पुणे) येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाबूनजीओ लाँय बीरुनगी (वय 40, रिपब्लिक ऑफ युगांडा) असे तिचे नाव आहे.
संबंधित महिला पर्यटनासाठी हिंदुस्थानात आली होती. बंगळुरू ते मुंबई प्रवासादरम्यान महामार्गावर वाई तालुक्यातील बोपेगावनजीक तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने ती बसचालकाशी हुज्जत घालू लागली. बस थांबल्यावर हुज्जत घालत ती बसमधून उतरून एका हॉटेलमध्ये लपून बसली होती. हॉटेल व्यवस्थापनाने पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलीस तेथे आल्याचे पाहून ती महामार्गावरून पळू लागली. पळताना महामार्गावरील धावत्या वाहनाला धडकून रस्त्यावर पडून जखमी झाली. तिच्यावर प्राथमिक उपचार केले.
त्यानंतर भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कोणत्याही परिस्थितीत समजून घेत नव्हती. तिने पोलीस ठाण्यातूनही दोन वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला न्यायालयात नेले असता न्यायालयाने तिला पुणे येथील येरवडा मनोरुग्ण रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक निवास मोरे, हवालदार घाडगे यांनी येरवडा येथील रुग्णालयात दाखल केले.



























































