
सामना प्रतिनिधी । नांदेड
जीवनसाथी संकेतस्थळावरुन एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवित पाच लाख रुपयांची फसवणूक केलेल्या विदेशी आरोपीस पोलीस अधिक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे आणि पोलीस निरिक्षक गजानन सैदाने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील एका पथकाने दिल्ली येथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्या आरोपीस मंगळवारी दि ६. नोव्हेंबर रोजी सायंकाळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जीवनसाथी संकेत स्थळावरुन एका विदेशी तरुणाने उपरोक्त महिलेशी सुत जुळवून लग्नाचे अमिष दाखवीत ४ लाख ९० हजार २०० रुपयाची फसवणूक केली. ही बाब सदर महिलेल्या लक्षात येताच त्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदरील प्रकरणाचा तपास सुरु असताना संशयीत हा दिल्ली येथे असल्याचे समजताच ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक गजानन क्षिरसागर, पो.कॉ बबरुवान लुंगांरे आणि सुनिल पत्रे या पोलीस कर्मच्याऱ्यांनी तात्काळ दिल्लीकडे रवाना होऊन ४ दिवस दिल्ली येथे तळ ठोकून मोठया शिताफिने आरोपी थियोफीलस मारो पि. अभी वय ३२ याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीस दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्या विदेशी आरोपीस ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.






























































