
खालापुरातील शिरवली ग्रामपंचायत हद्दीतील ढेबे-बर्गेवाडी रस्ता वन खात्याच्या अडथळ्यामुळे रखडला होता. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सरपंच महेश पाटील यांच्या प्रयत्नामुळे ग्रामस्थांचा 50 वर्षांचा वनवास संपला असून वन खात्याने रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या सरपंचाने ‘करून दाखवलं’ असे म्हणत ग्रामस्थांनी पाटील यांचे आभार मानले.
रस्त्याअभावी ढेबे-बर्गेवाडीच्या नागरिकांना प्रवास करणे कठीण बनले होते. 50 वर्षांहून रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागून नागरिकांचा खडतर प्रवास सुखकर व्हावा यासाठी सरपंच महेश पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. रस्त्यासाठी ३/२चा दावा वन खात्याने मंजूर केला. त्यामुळे ग्रामस्थांनी सरपंच महेश पाटील आणि वन विभागाचे अधिकारी राजेंद्र पवार यांचे आभार मानले. या वेळी सरपंच महेश पाटील, उपसरपंच गीता बांदल, रवींद्र देवकर, संदीप मोरे, विजय ढेबे, रवींद्र पाटील, महेश कडू, संदेश गोरडे, नाना पाटील, नितेश जाधव, प्रमिला पाटील, रघुनाथ ढेबे, अंकुश कदम, पांडुरंग बर्गे, संपत ढेबे, विष्णू पाटील, लक्ष्मण ढेबे, सचिन ढेबे, भांबू बर्गे, सचिन ढेबे आदी उपस्थित होते.
ढेबेवाडी-बर्गेवाडी हे कोयना प्रकल्पग्रस्त गाव आहे. परंतु या भागात स्थलांतर झाल्यानंतरही त्यांना मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत होते. गावापर्यंत जाणारा रस्ता हा वन विभागातून जात असल्यामुळे अनेक वेळा आजारी असणाऱ्या रुग्णांना डोली करून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत असे. पावसाळ्यात तर गंभीर स्थिती निर्माण होते. मात्र शिवसेनेने ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला. रस्त्याला वन खात्याची परवानगी मिळाल्याने समाधान आहे. – सरपंच महेश पाटील





























































