पाच जणांचा बळी घेणाऱ्या ‘लादेन’ला पकडण्यात अखेर यश

1054

ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात त्याच्या घरात घुसून अमेरिकेच्या सैनिकांनी ठार केल्याच्या घटनेला आठ वर्षे उलटली असली तरी आपल्याकडे आसाममध्ये ‘लादेन’ नावाची दहशत अजूनही कायम होती. गेल्या काही दिवसांत तर येथील लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, ‘लादेन पकडला गेला का…?’ कारण येथील गोलापोरा भागात एका रात्रीत या लादेनने पाच निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. हा लादेन दुसरा तिसरा कुणी नसून एक पिसाळलेला हत्ती आहे. पाच जणांचा बळी घेणाऱ्या लादेनला अखेर सोमवारी वनविभागाने पकडले आहे.

भाजप आमदार पद्मा हजारिका यांच्या नेतृत्वाखाली लादेनच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आलो होते. तब्बल 8 वनाधिकारी या जंगली हत्तीचा शोध घेत होते. त्यासाठी येथील सतबारी जंगलाचा प्रत्येक भाग ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने पिंजून काढला गेला. या हत्तीने आणखी कुणाचा जीव घेण्याआधीच त्याला पकडण्यात वनाधिकाऱ्यांना यश आले आहे.

आमदार पद्मा हजारिका यांच्या पथकाने लादेनला पकडल्यानंतर मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांचे अभिनंदन केले. आमदार हजारिका यांनी जंगली हत्तीला पकडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. एका खऱ्या प्रतिनिधीप्रमाणे हत्तीच्या हल्ल्याची भीती न बाळगता वनविभागाची मदत केली आणि हत्ती पकडण्यात त्यांना यश मिळाले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

वर्षभरात हत्तींच्या हल्ल्यात 57 जणांनी जीव गमावला
वन विभागाने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, या वर्षभरात जंगली हत्तींच्या हल्ल्यात आतापर्यंत 57 जणांनी जीव गमावला आहे. याच वर्षी जुलैमध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालयाने याबाबतची आकडेवारी लोकसभेत सादर करताना म्हटले होते की, अन्य राज्यांच्या तुलनेत आसाममध्ये हत्तींच्या हल्ल्यात मारले जाणाऱयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या